भातसानगर : १५ तारखेला घेतलेल्या पाच ग्रामपंचायतींचे निकाल साेमवारी जाहीर करण्यात आले. राष्ट्रवादीने तीन, तर शिवसेनेने चार ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. राष्ट्रवादीने दहिवली, चेरपोली, अल्याणी, तर शिवसेनेने चेरपोली, डोलखांब, भावसे, आल्याणी ग्रामपंचायती जिंकल्याचे परस्पर दावे केले आहेत.शहापूर तालुक्यात २०२१ च्या सुरुवातीस गेल्यावर्षीच्या मुदत संपलेल्या, पण कोरोना महामारीमुळे पुढे ढकलेल्या दहिवली, चेरपोली, अल्याणी, भावसे, डोलखांब या पाच ग्रामपंचायतींसाठी १५ तारखेला मतदान झाले होते. एकूण सदस्य संख्या ५१ साठी १३५ अर्ज दाखल केले होते. पैकी ४५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामुळे १९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. त्यामध्ये दहिवली ०६, चेरपोली ०३, आल्याणी ५, भावसे १, डोळखांब ४, उर्वरित ३२ जागांसाठी ७१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यामध्ये ३५ महिला उमेदवार, तर ३६ पुरुष उमेदवार निवडणूक लढवत होत्या. आजच्या मतमोजणीत बलाढ्य उमेदवारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे. सहाव्यावेळी निवडणूक लढविणारे माजी उपसरपंच विठ्ठल भेरे व दुसऱ्यांदा निवडणूक लढविणारे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचे भाचे धीरज झुगर यांना पराभवाचा सामना करावा लागला. मागील वर्षी घरकुले मंजूर न झाल्याने ती या ग्रामपंचायतींना कोणत्याही लाभार्थ्याला देता आली नाहीत. तर पाणीपुरवठा हा कळीचा मुद्दा अनेक ग्रामपंचायतींमध्ये बनला होता.भावसे ग्रामपंचायतीतील अभिमन्यू ठाकरे, जनार्दन महाले, नयना भुसारे, सुधीर गोधडे, रोशनी वरठा, प्रज्ञा वेखंडे, छाया धपाटे, आराध्या महाले हे उमेदवार विजयी झाले आहेत. अल्याणी ग्रामपंचायतीत विनायक सापळे तीनवेळा पराभव पत्करल्यानंतर पहिल्यांदा विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांचा विजय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. अन्य दर्शना घोडविंदे, बुधाजी वाघ, मनोज दळवी हे विजयी झाले आहेत. चेरपोली ग्रामपंचायतीत जगदीश पवार हे तालुक्यात सर्वाधिक मतांनी निवडून आले असून, त्यांना ६९७ इतकी मते मिळाली आहेत, तर अन्य चारुशीला भोये, ज्योती भोईर, प्रज्वल जाधव, ऋतुजा गावित, सुनील पांढरे, वैशाली मोरघे, राजश्री भोईर, किरण गोरे, सचिन शेलार, सुनील भेरे, तर ज्योती म्हसकर व अश्विनी फराड यांना समान मते मिळाल्याने चिठ्ठी पद्धतीने ज्योती म्हस्कर विजयी झाल्या, तर धीरज झुगरे यांचा चार मतांनी पराभव झाला. त्यांनी पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी करूनही निकाल कायम राहिला, तर भावसे ग्रामपंचायतीत सुधीर गोडदे, रोशनी वराठा, प्रज्ञा वेखंदे, छाया धाप आराध्या महाले, डोलखांबमध्ये उज्वला सांबरे या विजयी झाल्या आहेत. दहिवली ग्रामपंचायतीतून अरुण पाटील, निराबाई मुकणे, जयश्री पाटील, तर डोलखांब ग्रामपंचायतीत उज्वला सांबरे, सुधाकर वाघ, रवींद्र फर्डे, सुरेश मुकणे, करुणा चौधरी हे विजयी झाले आहेत. विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लाेष केला.
शहापूरमधील प्रस्थापितांना दणका; बलाढ्य उमेदवारांना घरचा रस्ता, राष्ट्रवादी, शिवसेनेचा वर्चस्वाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 9:16 AM