लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : केडीएमसीने अधिग्रहित केलेल्या पश्चिमेतील चिकनघर येथील ए अॅण्ड जी या खासगी कोविड रुग्णालयाने रुग्णांकडून जास्तीचे बिल आकारल्याने प्रशासनाने त्यांची मान्यता रद्द केली आहे. त्यामुळे अन्य रुग्णालयांचे धाबे दणाणले आहे.केडीएमसीकडे केवळ दोन मोठी रुग्णालये असल्याने वाढत्या रुग्णसंख्येला तोंड देण्यासाठी प्रशासनाने महापालिका हद्दीतील २४ खासगी रुग्णालये अधिग्रहित केली आहेत. या रुग्णालयांनी रुग्णांवर उपचार करताना केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या आरोग्य सेवा दर सूचीनुसार उपचाराचे बिल आकारायचे आहे. मात्र, खासगी अधिग्रहित केलेल्या रुग्णालयांकडून जास्तीचे बिल आकारले जात असल्याच्या तक्रारी महापालिकेस प्राप्त होत होत्या. महापालिकेने त्यासाठी भरारी पथक नेमले होते. त्याचबरोबर प्रत्येक रुग्णालयात कर्मचारी नेमला होता. या कर्मचाºयाने बिलाची शहानिशा केल्यावर रुग्णाने बिल भरावे, असे आयुक्तांनी सूचित केले होते.ए अॅण्ड जी या खासगी रुग्णालयात ३५ बेड होते. या रुग्णालयाच्या विरोधात जास्तीचे बिल आकारले गेल्याच्या तक्रारी प्रशासनास प्राप्त झाल्या होत्या. १९ प्रकरणांमध्ये या रुग्णालयाने नऊ लाख ३६ हजार रुपयांचे जास्तीचे बिल आकारल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. रजिस्ट्रेशन, ईसीजी, आॅक्सिजन यासाठी वेगळे दर आकारण्यात येत होते. रुग्णांना १२ हजार रुपयांचे पॅकेज सांगितले जात होते. टोसिलीझुमॅब इंजेक्शन रुग्णाला देताना त्यावरील एमआरपी दरापेक्षा जास्त दर आकारला जात होता. रुग्णालयात बेडची उपलब्धता किती आहे, त्याची आॅनलाइन माहिती उपलब्ध करून दिली जात नव्हती. या प्रकरणी महापालिकेने ६ जुलैला रुग्णालयास कारणे दाखवा नोटीस बजावली होती. रुग्णालयाकडून विहीत वेळेत खुलासा आला नाही. पाठपुरावा केल्यावर दिलेला खुलासा समर्पक नाही. या सगळ्या प्रकारात कोविड काळात रुग्णांचे आरोग्य, सार्वजनिक व आर्थिक हित जोपासण्यास असमर्थ ठरलेल्या रुग्णालयाची कोविड मान्यता आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रद्द केली आहे. या कारवाईनंतर महापालिकेने अधिग्रहित केलेल्या अन्य कोविड रुग्णालयांनी धसका घेतला आहे.‘नोटीस अद्यापमिळालेली नाही’यासंदर्भात ए अॅण्ड जी रुग्णालयाशी संपर्क साधला असता तेथे जबाबदार व्यक्ती प्रतिक्रिया देण्यास उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, तेथील डॉक्टरांनी केडीएमसीने अशा प्रकारची कारवाई केल्याची नोटीस अद्याप तरी आपणास प्राप्त झालेली नाही, असे सांगितले.
जादा बिल आकारणाऱ्या रुग्णालयास दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 12:55 AM