डोंबिवली : कोरोनामुळे हजेरी नोंदविणारी बायोमेट्रिक थंब इम्प्रेशन मशीन बंद केल्याची बाब केडीएमसीचे काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पथ्यावर पडली असताना गुरुवारी मनपाच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील ग प्रभाग क्षेत्र अधिकारी संदीप रोकडे यांनी लेटलतिफ कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिला. सकाळीच कार्यालयात पोहोचलेल्या रोकडे यांना कर्मचारी वेळेवर न आल्याचे समजताच त्यांनी दालनांना टाळे ठोकत चावी घेऊन वृक्षारोपण कार्यक्रमाला निघून गेले. तब्बल दीड तासांनी रोकडे पुन्हा कार्यालयात परतले तोपर्यंत कर्मचारी दालनाबाहेर खोळंबले होते. रोकडेंची कृती लेटलतिफांसाठी धडा शिकविणारी ठरली असली तरी याचा फटका कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनाही बसला.
केडीएमसीची कार्यालयीन वेळ सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ६.१५ इतकी आहे. सध्या कोरोनामुळे हजेरी नोंदविणारी बायोमेट्रिक मशीन बंद आहे. त्यामुळे सकाळी कामावर कधीही यावे आणि वेळ संपण्यापूर्वीच निघून जाणे हे चित्र मनपाच्या मुख्यालयासह सर्वच प्रभागक्षेत्र कार्यालयांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पाहायला मिळत आहे. शनिवार आणि रविवार सुट्टी असते. त्यामुळे शुक्रवारी दुपारीच फिल्डवर्कच्या नावाखाली काही अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालय सोडतात. वृक्षारोपण कार्यक्रमासाठी कार्यालयात रोकडे सकाळी १० वाजताच पोहोचले असता अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग, विवाह नोंदणी विभाग, पाणी आणि कर बिलवसुली विभागात कर्मचारी नसल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे संबंधित दालनांना टाळे ठोकून ते वृक्षारोपण कार्यक्रमाला निघून गेले.
--------------------
उपायुक्तांना दाखवायला स्टंटबाजी
रोकडेंच्या टाळे ठोकण्याच्या कृतीवर कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही मोजकेच कर्मचारी वेळेवर आलेले नसताना सर्वच कर्मचाऱ्यांना वेठीस का धरले असा सवाल त्यांचा आहे. अनुपस्थितीबाबत संबंधितांना लेटमार्क अथवा कारणे दाखवा नोटीस बजावणे आवश्यक होते. परंतु टाळे ठोकून इतरांना त्रास का? उपायुक्त पल्लवी भागवत कार्यक्रमानिमित्त येणार होत्या. त्यांना दाखवायला ही स्टंटबाजी केल्याची चर्चाही कर्मचाऱ्यांमध्ये रंगली होती. लेटलतिफ कर्मचाऱ्यांवर कारवाई करणारे रोकडे स्वत: कुठे वेळेवर आले, याकडेही त्यांच्याकडून लक्ष वेधण्यात आले.
----------------
मी टाळे ठोकलेच नाही
दालनांना ‘मी टाळे ठोकलेच नाही’ अशी प्रतिक्रिया रोकडे यांनी दिली आहे. कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेली नाराजी आणि उपायुक्त भागवत यांनी रोकडेंच्या कृतीवर नाराजी व्यक्त केल्याने रोकडेंनी घुमजाव केल्याची चर्चा आहे.
-------------------