अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेने शहर हागणदारी मुक्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला वेग देत आता थेट उघड्यावर प्रातर्विधीस बसणाऱ्यांना थेट पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे काम पालिकेच्या पथकाने सुरु केले आहे. पहिल्याच दिवशी २२ नागरिकांना उघड्यावर प्रातर्विधीस बसले म्हणून पालिकेच्या भरारी पथकाने त्यांना ताब्यात घेतले. ही मोहीम दररोज केली जाणार आहे. अंबरनाथ नगरपालिकेने वर्षभरापासून शहर हागणदारी मुक्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने शहरात अनेक ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृही उभारले आहे. तसेच अनेक स्वच्छतागृहांची दुरुस्तीही केली आहे. घरगुती स्वच्छतागृह उभारण्याची मोहीमही हाती घेतली होती. अनेक नागरिकांनी घरात आणि घराबाहेर वैयक्तिक स्वच्छतागृहे उभारली आहेत.स्वच्छतागृहाचे बांधकाम झाल्यावर पालिकेने आता उघड्यावर प्रातर्विधीस बसणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत केल आहे. महिन्याभरापासून पालिकेने उघड्यावर जाणाऱ्यांना बंदी घालत त्यांना स्वच्छतागृहाचा वापर करण्यास भाग पाडत होते. महिनाभर ही कारवाई केल्यावर जे नागरिक उघड्यावर बसतात त्यांना कायमची अद्दल घडविण्यासाठी कायदेशीर बाब पुढे केली आहे. मंगळवारी सकाळी पालिकेच्या भरारी पथकाने बुवापाडा आणि परिसरात उघड्यावर जाणाऱ्यांवर कडक कारवाई करत अनेकांना ताब्यात घेतले. टमरेल घेऊन उघड्यावर जाणाऱ्यांना या पथकाने पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. २२ नागरिकांवर ही कारवाई केली. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयात नागरिकांनी आपली चूक कबूल केली. पुन्हा उघड्यावर बसणार नाही याची हमी दिली. अखेर न्यायालयाने या सर्वांवर दंडात्मक कारवाई करुन सोडून दिले. पालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या कामासाठी बोलवत आहेत. रोजचे कामकाज सांभाळून या कर्मचाऱ्यांना याचे काम करावे लागत आहे. रोज सकाळी निश्चित केलेल्या ठिकाणी प्रत्येक कर्मचाऱ्याला जाऊन तेथील परिस्थिती सुधारण्याची जबाबदारी दिली आहे. शहरात बुवापाडा, मोरिवली पाडा, जावसई, फुलेनगर येथे सर्वाधिक नागरिक उघड्यावर प्रातर्विधीस जात होते. त्यामुळे या परिसरावर सर्वाधिक लक्ष देण्यात आले. (प्रतिनिधी)
उघड्यावर प्रातर्विधी करणाऱ्यांची धरपकड
By admin | Published: February 15, 2017 4:37 AM