ठाणे : ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी होळी आणि धूलिवंदननिमित्त राबविलेल्या विशेष ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह मोहिमेंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालयातील चार विभागांनी १२४ मद्यपी वाहनचालकांची झिंग उतरवली. यामध्ये सर्वाधिक ६६ जणांविरुद्ध ठाणे विभागातून कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
धुळवडीच्या नावाखाली अनेक जण मद्यप्राशन करून मोटारसायकल भन्नाट वेगाने चालवितात. यातून अनेकदा अपघात होऊन चालक तसेच पादचारी जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे शहर वाहतूक शाखेच्या ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या चार विभागांमार्फत ९ आणि १० मार्च रोजी ही विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये १८ युनिटमार्फत २२ श्वास विश्लेषकांच्या मदतीने १५ प्रमुख नाक्यांवर १५० ते २०० अधिकारी कर्मचारी यांनी ही कारवाई केली. १० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १२५ जणांविरुद्ध कलम १८५ अंतर्गत कारवाई केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.अशी झाली कारवाईठाणे 66भिवंडी 30कल्याण 14उल्हासनगर 14