जान्हवी मोर्र्येकल्याण : होळी खेळताना पाण्याचा वापर कमी करा, नैसर्गिक रंगाचा वापर करा. रासायनिक रंगाचा वापर टाळा तसेच सुके नैसर्गिक रंग वापरा असे आवाहन करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी एक कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी २०० शालेय विद्यार्थ्यानी पर्यावरणस्नेही होळी खेळण्याची तसेच पाणी वाचविण्याची शपथ घेतली.‘सुभेदार वाडा कट्टा’ यांच्या पुढाकारने हा कार्यक्रम सुभेदार वाडा शाळेत गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. पर्यावरण दक्षता मंचाकडून पर्यावरण स्नेही होळीविषयी दरवर्षी जनजागृती केली जाते. पर्यावरण दक्षता मंचाच्या निष्ठा राऊत, हेमांगी सामंत यांच्यासह सुभेदार वाडा कट्ट्याचे प्रमुख दीपक जोशी हे या वेळी उपस्थित होते. सातवी तसेच आठवीच्या वर्गातील २०० विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते. पर्यावरणपूरक होळी खेळून होळीचा खरा आनंद लुटता यावा, यासाठी विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंग कसे तयार करायचे याचे मार्गदर्शन या वेळी करण्यात आले.पर्यावरणपूरक होळी खेळल्याने पर्यावरणाचे संतुलन राखता येऊ शकते. रासायनिक रंगाचा वापर केल्यास त्यातील शिसे आणि अन्य घातक पदार्थ हे शरीरावर दुष्परिणाम करणारे ठरतात. प्रसंगी या रंगामुळे अंधत्व तसेच त्वचा रोगही होतात. याविषयी विद्यार्थ्यांना मंचाच्या वतीने माहिती दिली.पर्यावरण स्नेही होळी खेळण्यासाठी केवळ नैसर्गिक रंगाचा वापर पुरेसा नाही. तर बिनपाण्याची होळी खेळणेही महत्त्वाचे आहे. होळीत रंग खेळताना लाखो लीटर पाण्याची नासाडी होते. एकीकडे महाराष्ट्राच्या काही भागात पाण्यामुळे शेती धोक्यात आली आहे. अनेक जिल्हे हे पाण्याच्या टंचाईने होरपळून निघत असताना पाण्याची नासाडी करणे कितपत योग्य आहे असा सवाल मंचाने विद्यार्थ्यांना केला.पर्यावरण स्नेही होळी कार्यक्रमाविषयी शालेय स्तरावर जनजागृती करण्याचा हा पहिलाच कार्यक्रम कट्ट्याच्या पुढाकाराने सुभेदारवाडा शाळेत सुरु करण्यात आला असून कल्याणमधील गजानन विद्यालय, शारदा मंदिर विद्यालय या शाळेमध्येही घेतला जाणार आहे. शालेय जीवनातच पर्यावरणाचा संस्कार विद्यार्थ्याच्या मनावर कोरला गेल्यास पुढची पिढी पर्यावरण स्नेही घडविण्यास मदत होणार आहे. उपक्रम लहान असला तरी पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, याकडे कट्ट्याचे प्रमुख जोशी यांनी लक्ष वेधले आहे. विद्यार्थ्यांचा या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. याविषयी मंचाच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले.नैसर्गिक रंग कसे तयार करता येतात१. बीट - लाल रंग२. पळसाची पाने - सोनेरी रंग३. हळद -पिवळा रंग४. पालक -हिरवा रंग५.मेहंदी - मेहंदी रंग६.कात - तपकीरी रंग७.झेंडू - केशरी पिवळा रंगहे रंग तयार करण्याचे प्रात्याक्षिक दाखविले गेले. बीट, पळसाची पाने, हळदी, पालक, मेहंदी, पालक, कात, झेंडू हे रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्यास त्यापासून हे रंग तयार करता येऊ शकतात. हे रंग सुकविता देखील येतात. त्यापासून सुके रंग तयार होतात. या सुक्या रंगाचा वापर केल्यास शरीराला कोणतीही हानी होत नाही. शिवाय पाण्याची बचत होते. याकडे मंचाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले. मुलांनी या कार्यशाळेचा चांगला आनंद लुटला.
२०० विद्यार्थी साजरी करणार पर्यावरणस्नेही होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 2:23 AM