ठाणे : ‘नैसर्गिक रंगाने रंगपंचमी खेळूया, आरोग्य आणि पर्यावरण जपूया’ असे गीत गाऊन अंबरनाथच्या जिल्हा परिषद शाळा वांगणी क्रमांक ३ च्या विद्यार्थ्यांनी अनोख्या,नाविन्यपूर्ण पद्धतीने हाेळीच्या धुळवडीचा रंगाेत्सव साजरा केला केला. यासाठी त्यांनी कार्यशाळेत धडे घेऊन नैसर्गिक रंग तयार केले आणि जल्लाेषात धुळवड साजरी केली.
हाेळीच्या रंगपंचमी निमित्त बाजारात रासायनिक रंगाने दुकाने सजलेली दिसतात. हे रंग आपल्या आरोग्यास आणि पर्यावरणास हानिकारक असतात. रासायनिक रंगाने केस, त्वचा डोळे यांना हानी पोहोचते तसेच रंग स्वच्छ करण्यास भरपूर पाणीही लागते. त्यामुळे नाहक पाण्याचा अपव्यय होतो. यावर मात करून वांगणी क्र. ३च्या जिल्हा परिषदेच्या शाळेतली नवोपक्रमशील तालुका आदर्श शिक्षिका मनीषा रमेश जाधव यांनी नैसर्गिक रंगाने रंगपंचमी खेळूया आरोग्य आणि पर्यावरण ही जपूया हा उपक्रम शाळेत राबवला. त्यासाठी निसर्गातील पाणी, फुले फळे आणि घरातील कॉर्नफ्लॉवर मैदा, पाणी या साहित्याचा वापर करून सोप्या पद्धतीने नैसर्गिक रंग बनवण्याचे प्रात्यक्षिक कार्यशाळा जाधव यांनी घेऊन त्यात विद्याथ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळवला .
या रंगाेत्सवासाठी विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना साहित्य जमा करण्यास सांगितले. काही कोरडे रंग आणि काही पातळ रंग तयार करण्यात आले. नैसर्गिक रंग बनवताना मनातले तरंग आनंदाने तरंगत होते. शिक्षक आणि विद्यार्थी यांचे हात आणि मन दोन्ही रंगात रंगून जात होते. शाळेत बनवलेले रंग विद्यार्थी घरातही बनवणार आणि शाळेप्रमाणे घरात आणि परिसरात नैसर्गिक रंग बनवण्याचा संदेश दिला. रंगाचा वापर आरोग्य आणि पर्यावरण जपत विद्यार्थ्यांना धुळवडीचा आगळवेगळा आनंद मिळवून देण्यात आला. विद्यार्र्थ्याने बनवलेल्या नैसर्गिक रंगाचे प्रदर्शन भरविण्यात आले व त्याची विक्री साठी स्टॉल लावुन स्वनिर्मित रंगाची खरेदी तथा विक्रीचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटून एक अनोख्या पद्धतीने रंगोत्सव साजरा करण्यात आला.