डोंबिवली : कोरोनाचे सावट असले तरी शहरात विविध ठिकाणी कोरोनाचे नियम पाळून रविवारी पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली. दरम्यान, शनिवारच्या बंदनंतर रविवारी दिवसभर दुकाने उघडल्याने बाजारात वर्दळ दिसून आली.
पूर्वेतील रामनगर, दत्तनगर, आयरे, म्हात्रे नगर, तुकाराम नगर, संगीतावाडी, शेलार नाका, घरडा सर्कल, खांबाळपाडा, गोग्रासवाडी, एमआयडीसी, नांदिवली, गांधीनगर, तर पश्चिमेत दीनदयाळ पथ, कोपर परिसर, टेलकोस वाडी, मोठा गाव, गरिबाचा वाडा, उमेशनगर, महात्मा फुले पथ, सुभाष पथ, नवापाडा, आदी भागात पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी केडीएमसीने नागरिकांना होळी तसेच रंगपंचमी न खेळण्याचे आवाहन केले होते. मात्र, तरीही नागरिकांनी प्रथा, परंपरा जपण्यासाठी कोरोनाचे नियम पाळत मर्यादित प्रमाणात होळीचे पूजन केले. त्यानंतर होळी पेटविण्यात आली. बहुतांशी ठिकाणी रात्री लवकर होळी पेटविल्याचे पाहायला मिळाले. रात्री आठनंतर दुकानदारांनी दुकाने बंद केली. त्यामुळे रात्री उशिराने रस्त्यांवर तुरळक नागरिक, वाहने दिसून आली. शिस्तीच्या वातावरणात सण साजरा करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, रविवारी काही सोसायट्या, चाळींमध्ये रंगपंचमी साजरी करण्यात आली. लहान मुले रंग, पाणी, फुगे उडविताना दिसून आले.
-------