ठाणो : एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे वाढलेला ताणतणाव, त्यात मार्च एंडिंगच्या कामांची घाई असतानाच ठाणे जिल्हा परिषदेने शिक्षण व वित्त विभागातील ४५ जणांना मुख्याध्यापक व विस्तार अधिकारीपदी पदोन्नती देऊन होळीची आगळीवेगळी भेट दिली आहे. यामुळे कर्मचारी व अधिकारी वर्गात आनंदोत्सव साजरा होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या या पदोन्नतीसाठी सेवाज्येष्ठता विचारात घेऊन समुपदेशाद्वारे सर्वांसमक्ष मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी पदांची पदोन्नती करण्यात आली. यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुषमा लोणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, आदींचे मार्गदर्शन लाभले आहे. यामध्ये मुरबाड तालुक्यात शिक्षण विभागाला सहा नवीन विस्तार अधिकारी मिळाले आहेत.
शिक्षण विभागातील प्राथमिक आणि अर्थ विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न रखडलेला होता. यासाठी कर्मचाऱ्यांकडून मागणी केली जात होती. मात्र, कोरोना काळात प्रशासनाने आरोग्याच्या प्रश्नाला प्राधान्य दिले होते. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या कामाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली होती. याकडे लक्ष केंद्रित करून जि. प.ने शिक्षण विभागातील ३३ व वित्त विभागातील १२ जणांना यावेळी पदोन्नती देऊन त्यांना प्रोत्साहन दिले आहे.
या पदोन्नती प्राप्तमध्ये शिक्षण विस्तार अधिकारीपदाची पदोन्नती वर्ग तीनच्या श्रेणी दोनमधील आठ, विस्तार अधिकारी वर्ग तीन व श्रेणी तीनमधील सात आणि प्राथमिक शिक्षकांमधून मुख्याध्यापकपदी १८ जणांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेऊन आदेशही पारित केले आहेत. तसेच वरिष्ठ वेतनश्रेणी लाभ मंजुरीसाठी १५९ शिक्षकांचा प्रस्ताव प्रस्तावित आहे. त्याचबरोबर शिक्षक निवड श्रेणीसाठी कार्यवाही प्रस्तावित असून, लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. वित्त विभागाचे एक सहायक लेखा अधिकारी, चार कनिष्ठ लेखा अधिकारी, सात वरिष्ठ सहायक अशा एकूण १२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी आदेश जारी केले आहेत.