ठाणे - मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत, खारेगाव टोलनाका भागात पडलेल्या खड्ड्यांचा जाच बुधवारी देखील सहन करावा लागला. शाळेच्या बसेस, ॲम्बुलन्स, परिवहन सेवांच्या बसेस, रिक्षा, दुचाकी आदी वाहने तासंतास या वाहतूक कोंडीत अडकून पडली होती. बुधवारी पहाटेपासूनच पुन्हा वाहतूक कोंडीचा जात ठाणेकरांना सहन करावा लागला सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांना आणि चाकरमान्यांना देखील याचा फटका बसला. वाहतूक कोंडी तीन हात नाक्यापर्यंत तर दुसऱ्या बाजूने घोडबंदरपर्यंत गेली होती या वाहतूक कोंडीचा फटका अंतर्गत रस्त्यांना देखील बसल्याचे दिसून आले.
रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून सुरू झाले आहे. मात्र असे असतानाही बुधवारी देखील वाहतूक कोंडीचा त्रास ठाण्याला बसल्याचे दिसून आले. या वाहतूक कोंडीवर ना सत्ताधारी ना विरोधक कोणीही बोलायला तयार नाहीत. मागील जवळजवळ आठ ते दहा दिवसांपासून वाहतूक कोंडीचा जाच ठाणेकरांना सहन करावा लागत आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिक नाहक भरडला जात आहे. रस्ता दुरुस्तीवर दरवर्षी कोट्यावधींचा खर्च केला जातोय मात्र तरी देखील रस्त्यांची अवस्था पुन्हा जैसे थे अशीच दिसत आहे. बुधवारी सकाळपासून अत्यावश्यक सेवेच्या वाहनांसह रुग्णवाहिका, खासगी कंपन्यांच्या बसगाड्या, बेस्ट आणि टीएमटीच्या बसगाड्या, कार आणि दुचाकी या वाहतूक कोंडीमध्ये अडकून होत्या. अवघ्या १० मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना दोन तास लागत होता.
साकेत पूल ते नितिन कंपनी पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. तसेच साकेत ते घोडबंदर कासारवडवलीपर्यंत ही वाहतूक कोंडी झाली होती. यामध्ये सेवा रस्ते ही जाम झाले होते. दुसरीकडे वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी वाहन चालकांनी अंतर्गत रस्त्यावरून जाणे पसंत केले. मात्र त्या ठिकाणी देखील वाहनांची गर्दी झाल्याने शहरातील अंतर्गत भागातील रस्त्यांनाही कोंडीचा फटका बसला. विशेष म्हणजे घोडबंदर भागातील अनेक शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या, शाळेत वेळेवर शिक्षक पोहचू न शकल्याने अनेक शाळा प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली.