ठाणे : गेल्या काही दिवसांपूर्वी सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उडालेल्या खटक्यानंतर आता आयुक्त संजीव जयस्वाल यांनी थेट मंत्रालयात मुख्य सचिव अजय मेहता यांच्याकडे अर्ज पाठवून बदली मिळत नाही, तोपर्यंत सुटी मिळावी, अशी मागणी केली असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. आयुक्त थेट दीर्घकालीन रजेवर गेल्याने विकासकामांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.मागील आठवड्यात महापालिकेत पालिका प्रशासनात व्हॉट्सअॅपवरील मेसेजवरून चांगलाच गदारोळ झाला होता. तेव्हापासून आयुक्तांनी महापालिकेत प्रवेश केला नव्हता. मात्र, मंगळवारी त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सर्व विभागाच्या अधिकाºयांच्या घेतलेल्या बैठकीत खेळीमेळीचे वातावरण होते, अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाºयांनी दिली. आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी महापालिकेतील उपायुक्त आणि सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाºयांच्या बदल्या केल्या. सत्ताधारी शिवसेनेला डावलून त्या केल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त करून त्या रद्द करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे आयुक्तांनी अधिकाºयांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर संताप व्यक्त करताना वादग्रस्त विधान केले होते. यामुळे अस्वस्थ असलेल्या आयुक्तांनी बदलीच्या मागणीचे पत्र पाठवले आहे.राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती ओळखले जाणारे आयुक्त जयस्वाल यांचा गेल्या जानेवारी महिन्यातच महापालिकेतील पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे त्यांची कधी बदली होणार, अशी चर्चा शहरात सुरू होती. मात्र, ठाणे शहरातील बहुचर्चीत क्लस्टर योजनेची पायाभरणी तातडीने व्हावी, यासाठी आग्रही असलेले राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयस्वाल यांना अघोषित मुदतवाढ देऊ केली होती. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ठाण्यातील क्लस्टरसह विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमावेळी आयुक्त जयस्वाल हे पुढे होते.
आयुक्तांना हवीय बदलीपर्यंत सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 12:31 AM