जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असलेले गृहरक्षक दलाचे सुमारे दीड हजार जवान गेल्या तीन महिन्यांपासून वेतनापासून वंचित असल्याची माहिती याच जवानांनी दिली आहे. आधीच वेगवेगळ्या प्रकारे पिळवणूक सुरु असताना, आता वेतनही वेळेत मिळत नसल्यामुळे संसाराचा गाडा कसा हाकायचा, असा प्रश्न या दलातील अनेकांपुढे ठाकला आहे.ठाणे जिल्ह्यातील रेल्वेस्थानके, पोलीस ठाणी तसेच वाहतूक नियंत्रण शाखेच्या मदतीसाठी गृहरक्षक दलातील महिला आणि पुरुष जवानांची नियुक्ती केली जाते. त्यांना ६७० रुपये प्रतिदिवस याप्रमाणे साधारण २० हजारांचे तुटपुंजे मानधन प्रतिमहिना मिळते. पण, यातूनही जर बंदोबस्ताचा संपूर्ण महिना भरला, तरच हे इतके मानधन त्यांच्या पदरात पडते. अन्यथा, अवघ्या १० किंवा १५ दिवसांचेच, म्हणजे केवळ १० ते १५ हजारांचे मानधन हातात पडते. तेही महिना भरल्यानंतर हातात पडेल, याची काहीही शाश्वती नाही. ठाणे जिल्ह्यातील किमान दीड ते दोन हजार जवानांना आॅगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यांच्या कालावधीतील वेतनच देण्यात आलेले नाही. त्यामुळे ज्यांचे संपूर्ण कुटुंब या जवानांच्या वेतनावर चालते, ती कुटुंबं हवालदिल झाली आहेत. जिल्हा मुख्यालयात या थकीत वेतनाची चौकशी केल्यानंतर ते जिल्हा कोषागार शाखेत टाकण्यात आल्याची उत्तरे या जवानांना दिली जातात. दिवाळी तसेच इतरही महत्त्वाचे बंदोबस्त करण्यात पोलिसांना चांगला हातभार लावणारे हे जवान मात्र उपेक्षित आहेत. त्यामुळे रेल्वे, वाहतूक विभाग आणि संबंधित पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी या जवानांनी केली आहे.
गृहविभागाकडून येणारे अनुदान आले नसल्यामुळे गृहरक्षक दलाच्या जवानांची बिले प्रलंबित आहेत. त्यांनी दिवाळी तसेच अनेक बंदोबस्त चांगल्या प्रकारे केले आहेत. लवकरच तीन कोटींचा निधी येणार असल्यामुळे हा प्रश्न काही अंशी तरी येत्या काही दिवसांमध्ये मार्गी लागेल.संजय पाटील, जिल्हा समादेशक, गृहरक्षक दल, ठाणे