लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात केलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका बांधकाम व्यवसायाला बसला आहे. लॉकडाऊन काळामध्ये हाताला काम न उरल्याने परप्रांतीय मजूर आपल्या गावी परतले. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर आता कुठे बांधकाम व्यवसाय मूळ पदावर येत आहे. मागील वर्षभरातील कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करून पुन्हा व्यवसाय अनलॉकमध्ये सुरू झालेला असताना आता बांधकाम साहित्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील व्यावसायिकांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. मात्र, नफा कमी मिळाला तरी महाग साहित्य खरेदी करून प्रकल्प मार्गी लावून बुकिंग करणाऱ्यांना घरे तयार करून देणे हे आव्हान या व्यावसायिकांपुढे आहे.
--------------------
गृहप्रकल्प पूर्ण करण्यावर भर
बांधकाम साहित्याचे दर ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. गृहकर्ज स्वस्त असले तरी बांधकाम व्यावसायिकांचा बांधकाम खर्च वाढला आहे. गावापासून दूर अर्थात शहराच्या बाहेर घर घेतले तर प्रवासाचा खर्च वाढतो. त्यामुळे शहरात घर घेणे सोयीचे असते. गावाबाहेर प्रकल्प अधिकृत आहे की नाही, याची शाश्वती देता येत नाही. शहरातील विकासक हे अधिकृत काम करून नफा न कमाविता प्रकल्प पूर्ण करून देण्यावर अधिक भर देत आहेत. नफा नाही मिळाला तरी चालेल ग्राहकाला दिलेला शब्द पाळण्यासाठी धडपड सुरू आहे. वेळेत घर ग्राहकाला मिळायला हवे.
- रवी पाटील, माजी अध्यक्ष, एमसीएचआय कल्याण
---------------------------------
साहित्य विक्रेते म्हणतात
१. मागच्या वर्षी बांधकाम साहित्याला उठाव नव्हता. कारण कोरोना होता. आता मागणी आहे. मात्र दर जास्त आहे. त्यामुळे सध्या तेजी आहे.
- गुणाजी पाटील
२. आता नर्मदा रेतीला जास्त मागणी आहे. त्यामुळे इथल्या रेतीला भाव कमी मिळतो. रेडिमेड रेतीही बिल्डरकडून मागितली जात आहे.
- दीपेश भोईर
-------------------------------
गृहखरेदी महाग
१. गृहकर्ज स्वस्त झाले असले तरी प्रत्यक्षात त्याचा फायदा गृह खरेदी करणाऱ्यास मिळत नाही. बांधकाम साहित्य महागले असल्याने गृहकर्ज स्वस्त झाल्याचा फायदा मिळणे कठीण आहे.
- भिकाजी वाखरे, कल्याण
२. आम्हाला घर खरेदी करायचे आहे. गृहकर्ज स्वस्त झाले असले तरी माझ्या पतीच्या पगारात कपात झाली आहे. कर्ज मिळणार की नाही, याबाबत साशंकता आहे.
- सपना देवके, कल्याण
----------------------------
साहित्य - दर -२०२१
सिमेंट -४०० रुपये-५० किलाेची एक गोणी
विटा - ६००० रुपये-१ हजार नग
वाळू - ९० रुपये-४० किलोची एक गोणी
खडी - २००० रुपये
स्टील - ५६ रुपये एक किलो
------
साहित्य - दर-२०२०
सिमेंट - ३८० रुपये-५० किलाेची एक गोणी
वीटा - ४००० रुपये-१ हजार नग
वाळू - ६० रुपये-४० किलोची एक गोणी
खडी- १२५० रुपये
स्टील - ३० रुपये प्रति किलो
----------
असे आहेत गृहकर्जाचे दर (टक्केवारीत)
एचडीएफसी-६.७५
आयसीआयसीआय-६.७५ ते ७.५०
एसबीआय-६.७५
टाटा कॅपिटल-७.४५
येस बँक-८.७५
ॲक्सिस बँक-७.१०
---------------