ठाणे : राज्याचे गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ब्लडलाइन या रक्तपेढीमध्ये जाऊन बुधवारी प्लाझ्मादान केले. यावेळी त्यांच्यासोबत शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनीदेखील प्लाझ्मादान केले. कोरोनातून मुक्त झालेल्या सर्वच लोकांनी प्लाझ्मादान करावे; जेणेकरून इतर रुग्णांना त्याचा लाभ होईल, असे आवाहन त्यांनी केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करू नये. ठाणे शहरात कोणत्याही प्रकारचे होर्डिंग्ज लावू नये; त्याऐवजी कोविडयोद्धे आणि गोरगरीब जनतेसाठी लाभदायक उपक्रम राबवा, असे आवाहन केले होते. त्यानुसार, कार्यकर्त्यांनीही ठिकठिकाणी अन्नधान्यवाटप, सॅनिटायझर, मास्कवाटप असे उपक्रम राबविले. ठाणे-मुंबईमध्ये सहा ठिकाणीच प्लाझ्मा संकलन करण्यात येत होते. मुंबईमध्ये चार आणि नवी मुंबई, नालासोपाऱ्यात प्रत्येकी एका ठिकाणी हे संकलन करण्यात येत होते. परिणामी, वाहतुकीच्या समस्येमुळे ठाण्यातील रुग्णांना त्याचा लाभ घेणे जिकिरीचे होत होते. मात्र, आता ही समस्या निकाली निघाली आहे. ठाणे शहरातील ब्लडलाइन या रक्तपेढीला ही परवानगी मिळाली आहे. या रक्तपेढीमध्ये एकावेळी तीन जणांचे प्लाझ्मा संकलन करणे शक्य होणार असून किमान १०० जणांचे प्लाझ्मा साठवणे शक्य होणार आहे, अशी माहिती डॉ. शिल्पा जैन यांनी दिली.१० हजार मास्क, एक हजार कुटुंबांना केले धान्यवाटपआव्हाड यांनी केलेल्या आवाहनानुसार परिवहन समिती सदस्य शमीम खान आणि नगरसेवक शानू पठाण यांच्या वतीने सुमारे १० हजार मास्क, एक हजार आॅक्सिमीटर, ५०० थर्मल स्कॅनिंग गन आणि एक हजार कुटुंबांना धान्यवाटप केले. या उपक्रमाचे प्रातिनिधिक वाटपडॉ. आव्हाड यांच्या निवासस्थानी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून करण्यात आले. तर, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी या उपक्रमांतर्गत बेरोजगारांना भाजीविक्रीसाठी टेम्पोचे वाटप करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन द फार्मर स्टॅण्डचे प्रोप्रायटर सचिन पवार यांनी केले होते.