मुंब्रा : मतदारसंघाचा विकास करताना अनेक अडचणी आल्या. युती सरकारच्या काळातील ठामपाचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी सुरुवातीला विकास कामांवरून संघर्ष झाला. जयस्वाल यांनी तर ‘उपर मोदी का शासन है, निचे देवेंद्र फडणवीस है, कभी भी मर जाएगा तू’ असे बोलून मला घाबरवण्याचा प्रयत्न केला होता, असा गौप्यस्फोट गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी रात्री मुंब्र्यात केला.
आव्हाड म्हणाले की, जयस्वाल यांनी घाबरवले तरी न घाबरता मी विकासकामांना प्राधान्य दिले. दिलजमाई झाल्यानंतर जयस्वाल यांनी मोठ्या प्रमाणावर निधी दिल्यामुळे मुंब्र्यातील अनेक विकासकामे मार्गी लागल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विरोधी पक्षनेते अशरफ (शानू) पठाण यांच्या प्रभागातील विविध विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये मृत्यूच्या दारापर्यंत जाऊन परत आलो ते फक्त नागरिकांच्या आशीर्वादांमुळे, असेही ते म्हणाले. फेरीवाल्यांमुळे शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी कायमची संपुष्टात यावी यासाठी एमएम व्हॅली रस्त्यावर हॉकर्स प्लाझाची निर्मिती करण्यात येणार असून, त्यानंतर मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यांना बसू देणार नसल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाला पठाण, तसेच परिवहन समितीचे सदस्य शमीम खान, पक्षाचे राष्ट्रीय सचिव सय्यद अली अशरफ आदी उपस्थित होते.