ठाणे : व्याधिग्रस्त आणि घरीच उपचार घेणाऱ्या काेराेना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वर्षभरात वाढले आहे. रुग्णालयात उशिरा दाखल झालेल्या ६०० रुग्णांचा मृत्यू झाल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. यापुढे असे मृत्यू रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने ठोस पावले उचलली आहेत. त्याअनुषंगाने होम आयसोलेशनमध्ये असलेल्या व्याधिग्रस्त, पोस्ट कोविड व हायरिस्क रुग्णांच्या प्रकृतीबाबत काॅल सेंटरच्या माध्यमातून चाैकशी करून दरराेज नाेंदी ठेवल्या जाणार आहेत. चार विशेष डॉक्टरांच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव १९ मे रोजीच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.
ठाण्याचा मृत्युदर हा इतर शहरांच्या तुलनेत कमी आहे. रुग्ण चार पटीने वाढत असताना मृत्युदर स्थिर असल्याचे दिसून आले आहे. व्याधिग्रस्त आणि कोरोनाबाधित रुग्ण उशिराने रुग्णालयात दाखल होत असल्याने मृत्यू वाढल्याचे दिसत आहे. असे मृत्यू रोखण्यासाठी महापालिकेने तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तयार केली आहे. या डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांच्या जोडीला असलेल्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने अशा प्रकारच्या रुग्णांची दररोज विचारपूस केली जाणार आहे. त्यांना कोणत्या स्वरूपाचा त्रास आहे. ताप, ऑक्सिजन लेव्हल, वास घेण्याची क्षमता कशी आहे, याबाबत नाेंद करून त्यांना योग्य औषधोपचार दिले जाणार आहेत. व्याधिग्रस्त नागरिकांची नियमित माहिती घेतल्यास त्यांना कोविड होण्याचा व त्यांच्यामुळे इतर लोकांना प्रादुर्भाव होण्याचा धोका टाळणे शक्य होणार आहे. तसेच त्यांचे मानसिक संतुलन योग्य ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच पोस्ट कोविड रुग्णांनाही दैनंदिन फोन करून त्यांच्या प्रकृतीची नोंद घेण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. या नाेंदी ठेवण्यासाठी खासगी संस्थेच्या माध्यमातून सुसज्ज कॉल सेंटर तयार करण्यात येणार आहे. या कॉल सेंटरच्या माध्यमातून प्रकृती खालावलेल्या रुग्णांचा डाॅक्टरांसाेबत तत्काळ संवाद करून देण्यात येईल.
या डाॅक्टरांची हाेणार नियुक्ती
डॉ. स्वाती शिंदे, डाॅ. मनीषा म्हस्के, डाॅ. नेहा कोल्हे आणि डाॅ. तानाजी पाटील यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या वैद्यकीय अधिकाऱ्यांची मासिक वेतन ६० हजार याप्रमाणे तीन महिन्यांसाठी करारपद्धतीने नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी सात लाख २० हजारांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.