मीरा रोड : सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या लाभासाठी मीरा-भाईंदरमधील निराधार आणि विधवांना ठाणे येथील तहसीलदार कार्यालयात खेपा माराव्या लागतात. मीरा-भाईंदरसाठी स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालय सुरू असल्याने या योजनेच्या सुविधाही येथेच उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेंतर्गत वार्षिक २१ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या घटस्फोटित, विधवा यांना महिना ६०० रुपये मदत केली जाते. या योजनेचे कार्यालय ठाणे तहसीलदार यांच्या अंतर्गत असल्याने मीरा-भाईंदरमधील गरजू महिलांना या योजनेसाठी ठाण्याला जावे लागते. मीरा- भाईंदरमधून ठाण्याला जाणे म्हणजे खर्चिक तर आहेच, शिवाय वाहतूककोंडी पाहता गरजू महिलांना ठाण्याला खेपा मारणे परवडत नाही. दिवस वाया जातोच शिवाय त्रासाला सामोरे जावे लागते. एका खेपेत कामही होत नाही. आधीच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या या महिलांना ठाण्याच्या खेपा मारणे जिकिरीचे झाले आहे.
मीरा-भाईंदरची झपाट्याने वाढती लोकसंख्या पाहता भाईंदरच्या मॅक्सस मॉलमागील पालिका इमारतीत अपर तहसीलदार कार्यालय सुरू झाले आहे. परंतु, संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध योजना या ठाणे तहसीलदार यांच्या कार्यालयातूनच राबवल्या जातात. त्यामुळे संजय गांधी निराधार योजना येथील अपर तहसीलदार कार्यालयात सुरू करावी, अशी मागणी होत आहे. जेणेकरून, महिलांना ठाण्याच्या खेपा माराव्या लागणार नाहीत आणि पैसे व वेळ वाया जाणार नाही.
कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी
मीरा रोड प्रभाग समिती सभापती हेतल परमार यांनी नुकतेच जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह तहसीलदार ठाणे, अपर तहसीलदार मीरा-भाईंदर, महापौर आणि आयुक्तांना निवेदन देऊन भाईंदर येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेचे कार्यालय सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी आवश्यक कर्मचारीवर्गाची नियुक्ती करावी. त्याचसोबत महिलांची अडचण पाहता तातडीने या योजनेची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे परमार यांनी म्हटले आहे.