कोविड, खासगी रुग्णालये रुग्णांची लूट करत आहेत, हे नवीन नाही. पण, डॉक्टर नसलेल्या व्यक्तीकडून रुग्णांवर उपचार करणारा प्रकार नुकताच कल्याणमध्ये उघड झाला. नागरिकांच्या जीवाशी खेळ होतच आहे, पण रुग्णालय चालवणे हा गोरखधंदा झाला आहे. नोंदणी कुणाच्या नावाने आणि चालवतो भलताच, असा प्रकार काही शहरांत उघड झाला असून याचा ‘लोकमत’ने घेतलेला हा आढावा...
- धीरज परबमीरा रोड : कायद्यानुसार कोणत्याही वैद्यकीय शाखेतील व्यक्ती रुग्णालय चालवू शकते. त्यामुळे एमडी सर्जन आदींना गरजेनुसार कामावर ठेवत युनानी, होमियोपॅथी, आयुर्वेद शाखेतील डॉक्टरांनी मीरा-भार्इंदरमध्ये रुग्णालये थाटली आहेत. त्यामुळे तक्रारी आणि कारवाईमुळे अगदीच मुन्नाभाई डॉक्टर आता उघडपणे दिसत नाही. परंतु, पॅथॉलॉजी लॅबमध्ये मात्र सर्रास मुन्नाभाई सक्रिय आहेत. महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषदेकडे नोंदणी नसणारे लॅब चालवत आहेतच, पण एमडीच्या नावाआड तर काही होमियोपॅथी डॉक्टरही पॅथॉलॉजी लॅब चालवत आहेत. रुग्णालय असो वा लॅब यातून नागरिकांच्या आरोग्याचे हित जपण्यापेक्षा बक्कळ कमिशन आणि व्यवसाय म्हणून याकडे जास्त पाहिले जात आहे.
मीरा-भार्इंदरमध्ये आजघडीला दीडशेपेक्षा जास्त रुग्णालये आहेत. गल्लीबोळांत, दोनचार सदनिका वा गाळे एकत्र भाड्याने घेऊन त्यातही रुग्णालये थाटली जात आहेत. रुग्णालय म्हटले की, रुग्णाच्या जीवितास जपणे व वाचवणे, याचबरोबर रु ग्णास कधीही तातडीच्या उपचार व शस्त्रक्रियेचीही गरज लागू शकत असल्याने त्या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असणे आवश्यक आहे. परंतु, कायद्याने कुणालाही रुग्णालय चालवण्यास परवानगी असल्याने आता शहरात युनानी, होमिओपॅथी, आयुर्वेदिकपासून अन्य कोणी रुग्णालये चालवत आहेत.रुग्णालयात अॅलोपॅथी उपचार करणारे एमडी, सर्जन आदींची भूमिका महत्त्वाची असली, तरी त्यांना रुग्णालयात सल्लागार वा व्हिजिटनुसार पैसे देऊन अगदी युनानी, होमियोपॅथी व अन्य कोणीही स्वत:ची रुग्णालये थाटून चालवत आहेत. यामुळे रुग्णाला वेळीच निदान आणि उपचार न मिळाल्याने केस बिघडण्याचे प्रकार घडत आहेत. अनेकवेळा अशा काही प्रकारांमुळे होणारी दिरंगाई रुग्णाच्या जीवावर बेतते.रुग्ण व त्याचे नातलगही आपण ज्या रुग्णालयात चाललो आहोत, तो स्वत: तज्ज्ञ आहे का, हे पाहतच नाही आणि त्यातून केस गंभीर होण्याचे प्रकार घडतात, असे काही डॉक्टरच बोलून दाखवतात. हल्ली तर दोनचार डॉक्टर मिळूनच स्वत:चे रुग्णालय सुरू करतात. त्यातही डॉक्टरच्या डिग्रीपेक्षा तो व्यापार करण्यात तरबेज असेल, तर रुग्णालय फॉर्मात चालते. एका आयुर्वेदिक डॉक्टरने तर मल्टीस्पेशालिटी आलिशान रुग्णालय शहरात झटपट उभारलेच, शिवाय अन्य शहरांतही शाखा सुरू केल्या.
गल्लीबोळांत रु ग्णालये सुरू होऊ लागल्याने व्यवसाय खेचण्यासह स्पर्धा वाढली आहे. रुग्णालयात रुग्ण पाठवण्यासाठी खाजगी दवाखाने चालवणाऱ्या डॉक्टरांशी अर्थपूर्ण संधान साधले गेल्याची चर्चा नवीन नाही. याशिवाय, रुग्णालयातच औषधांचे दुकान चालवण्याचे कंत्राट देणे फायदेशीर ठरते. काहींनी तर आता पॅथॉलॉजी लॅब सुरू केल्या आहेत वा काही खाजगी लॅबशी संधान बांधलेले असते. त्यातच राजकीय आणि प्रशासकीय संबंधही रुग्णालयांना विविध कारणांसाठी जपावे लागतात. वैद्यकीय क्षेत्रात उपचार, सुविधा आदींचे निश्चित असे दर नसले तरी औषधे, उपचार व सुविधेसाठी आकारलेले दर पाहून रुग्ण आणि नातलगांचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहत नाहीत. मग लोकप्रतिनिधी, राजकारणी किंवा अधिकारीवर्गाची ओळख काढून बिल कमी केले जाते. हल्ली तर बिल कमी करायला लावतो, असे सांगणारे राजकारणी समोर आले आहेत. म्हणजेच जर राजकारणी आदींना मध्ये घातले तर काही हजार रुपयांचे बिल कमी केले जाते, म्हणजे ते जास्त लावलेले आहे वा यात फायदा भरपूर आहे, असेच म्हणावे लागेल.दुसरीकडे, पॅथॉलॉजी लॅब चालविणाऱ्यांमध्ये तर मुन्नाभार्इंचा आणि कमिशनखोरीचा उच्छाद आहे. लॅब चालवणाºयांची शैक्षणिक पात्रता आणि डीएमएलटी असेल तर ती महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषदेकडे नोंदणीकृत आहे का, हे पालिका तपासतच नाही. काही लॅबचालकांनी एमडीच्या नावाआड लॅब थाटलेल्या आहेत. शहरात ७० च्या आसपास पॅथॅलॉजी लॅब आहेत. ते चालवणाºयांच्या शैक्षणिक पात्रतेचा प्रश्न मोठा गंभीर आहे. लॅबमध्ये काम करताकरता काहींनी पात्रता नसताना स्वत:च्या लॅब थाटल्या आहेत. लॅब परवान्यासाठी एमडीच्या नावाचा वापर केला जातो आणि त्यासाठी एमडीना मासिक रक्कम ठरवली जाते. एमडी त्या लॅबमध्ये फिरकतदेखील नसले, तरी चाचणी अहवाल मात्र दिले जातात. डीएमएलटीची सरकारकडे नोंदणी नसताना लॅबना परवानगी दिल्या जातात तसेच आता डॉक्टरनांही लॅबचा परवाना दिला जातो का, असा प्रश्न पडला आहे.लॅबकडून डॉक्टरांना दिले जाते कमिशनडॉक्टरांनी रु ग्णांना लॅबमध्ये पाठवण्याची शिफारस करावी, यासाठी ७० टक्क्यांपर्यंत कमिशन दिले जाते, असे जाणकारांनी सांगितले. चाचण्या न करताच अहवाल देण्याचा प्रकारही केला जातो. डॉक्टरांना लॅबशी टायअप करण्यासाठी कमिशनसोबतच पार्टी आदींचे आयोजन केले जाते. काहीजण तर डॉक्टरांना अॅडव्हान्समध्येच कमिशन देतात. काही डॉक्टरही रक्त आदी तपासणी करून घेण्याचा सतत सल्ला देतात. कमिशनखोरीमुळे चाचण्यांचा दर्जा, खर्च आणि नफेखोरी आदी चर्चेचा विषय ठरतात. जे लॅबचालक डॉक्टरांना हाताशी धरत नाहीत, त्यांच्याकडे रु ग्णांचे प्रमाणसुद्धा कमी असते.