ठाणे - खारटन रोड येथील लफाट चाळीत राहणाऱ्या १९१ सफाई कर्मचाऱ्यांना पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप)अंतर्गत विकसित करण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये मालकीहक्काची घरे देण्यात येणार आहेत. सद्य:स्थितीत येथील कर्मचाऱ्यांनी सदनिका रिकामी केली असल्यामुळे त्यांच्या पगारातील घरभाडे व सेवाशुल्क माफ करण्यात येणार असल्याचे पत्र बुधवारी महापौर नरेश म्हस्के यांनी प्रातिनिधिक स्वरूपात १० कर्मचाऱ्यांना दिले. त्यावेळी महापौरांनी ही माहिती दिली.या कार्यक्रमास उपमहापौर पल्लवी कदम, नगरसेवक सुधीर कोकाटे, सुनील हंडोरे, नगरसेविका नम्रता कोळी, विमल भोईर, मालती पाटील, माजी नगरसेवक पवन कदम, उपआयुक्त अशोक बुरपल्ले, स्थावर मालमत्ता विभागाचे कार्यालयीन अधीक्षक महेश आहेर, प्रवीण वीर, कामगार नेते बिरपाल भाल, तसेच सफाई कर्मचारी उपस्थित होते.खारटन रोड येथील महापालिकेच्या मालकीहक्क असलेल्या जागेवर पीपीपी अंतर्गत पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. याठिकाणी राहत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या पगारातून घरभाडे कपात करण्यात येत होते; परंतु ठाणे महापालिकेच्या महासभेने याबाबत एकमताने निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांच्या पगारातील घरभाडे कपात न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सद्य:स्थितीत नवीन इमारतीच्या बांधणीसाठी १०० सफाई कर्मचाऱ्यांनी घरे रिकामी केली असल्यामुळे त्यांच्या पगारातील घरभाडे भत्ता व सेवाशुल्क कपात न करण्याबाबतचे पत्र महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते देण्यात आले. प्रश्न सोडवण्यासाठी केला पाठपुरावा जसजसे या चाळीतील घरे सफाई कर्मचारी रिकामी करतील त्याप्रमाणे त्यांचेही घरभाडे कपात केले जाणार नाही. यासाठी उपमहापौर पल्लवी कदम, नगरसेवक सुधीर कोकाटे, सुनील हंडोरे, स्थानिक नगरसेविका नम्रता कोळी, माजी नगरसेवक पवन कदम, जयेंद्र कोळी यांनी सतत प्रशासनासोबत पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावून कर्मचाऱ्यांचा हा लढा यशस्वी केला. त्याबद्दल महापौरांनी त्यांचेही आभार मानले. दिव्यांगांनाही मिळणार कायमस्वरूपी घरे ठाणे : दिव्यांग व्यक्तींचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शासनाच्या धोरणानुसार दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. दिव्यांग व्यक्तींसाठी मालकी हक्काची घरे ठाणे महापालिकेच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या घरांचे चावीवाटपदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केले होते. परंतु, कोविडमुळे त्यांना ताबा देण्यास विलंब झाला. याबाबत महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनासोबत केलेल्या पाठपुराव्यामुळे येत्या ५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे दिव्यांगांना या घरांचा ताबा देण्यात येणार असून त्यांना कायमस्वरूपी घरे देणारी ठाणे ही पहिली महानगरपालिका असल्याचा दावा महापौरांनी केला आहे. दिव्यांग व्यक्तींचे योग्य प्रकारे पुनर्वसन व्हावे, यासाठी दिव्यांग व्यक्तींकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले होते. याची योग्य छाननी करून एकूण १९० दिव्यांग पात्र ठरविले आहेत. याचे प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावीवाटप केले होते. परंतु, कोविडमुळे हे काम प्रलंबित होते. तसेच म्हस्के यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या सदनिकांमधील साहित्य तातडीने हटवून सदनिका तातडीने संबंधितांना उपलब्ध करून देण्याबाबत मनपा आयुक्तांना कळविले होते. त्यानुसार, त्यांनी दिव्यांगांना सदनिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे, ठाणे महापालिकेचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 1:34 AM