संतोष सोनवणे
जून महिना उजाडला की, लगबग दिसते ती मुलांची आणि पालकांची. कुठे शालेय साहित्य खरेदीची गडबड तर कुठे पावसाच्यादृष्टीने आवश्यक शालेय वस्तूंची शोधाशोध सुरू होते. काही शाळा या १० जूनपासून सुरू झाल्या, तर काही १५ किंवा १७ जूनला सुरू होणार आहेत.
दोन महिन्यांच्या सुटीनंतर पुन्हा एकदा शाळा नामक व्यवस्थेत वर्षभराकरिता बालकांचा प्रवेश होणार. एका बंदिस्त वेळापत्रकात अडकले जाणे हे बालकाच्या मानसिकतेच्या दृष्टीने सोपे नाही. याकरिता शाळा, शिक्षक व पालक या तीनही घटकांनी बालकाचा आणि त्याच्या मानसिक स्थितीचा साकल्याने विचार करायला हवा. उन्हाळी सुटीनंतर शाळा सुरु होत आहेत. नवा वर्ग, नवीन पुस्तके, नवे दप्तर, नवे शिक्षक, नवे मित्र त्यासोबतच नवा उत्साह आणि उत्सुकताही असते. आपण आता एका वर्गाने पुढे गेलो आहोत, या विचाराने मुल आनंदी आणि चैतन्यमय असतात. मनातील काही इच्छा, अपेक्षा आणि आकांक्षा या विचाराने मुले शाळेत जाण्यास आतुर झालेली असतात. सुटीतील मौजमस्ती संपून एकदम हा बदल स्वीकारणे तसे अवघड आहे. अशावेळी हाच विचार लक्षात घेऊन शाळा, शिक्षक आणि पालक या तीनही घटकांनी त्या बालकाचे बोट अतिशय विश्वासाने पकडणे गरजेचे आहे. मुलांना शाळेसंदर्भात योग्य तो सकारात्मक दृष्टीकोन दिला पाहिजे. अर्थात यात प्रत्येक घटकाची भूमिका ही वेगवेगळी असणार आहे.पालकांची भूमिका महत्त्वाची :
मुलांप्रमाणेच पालकांनाही आपल्या पाल्याच्या शाळा सुरु होण्याच्या प्रक्रि येचे एक विलक्षण असे वेड आणि आनंद असतो. केवळ चांगली शाळा, बक्कळ फी, भौतिक सुविधा, आदी गोष्टींच्या पुर्ततेमधून पालकांची जबाबदारी संपत नाही. मोठ्या सुटीनंतर सुरु होणारी शाळा आणि माझ्या पाल्याची शाळेत जाण्याकरिता असलेली भावनिक व मानसिक स्थिती याची योग्य सांगड घालता आली पाहिजे. मुलांसोबत त्यांच्या शाळेविषयी चर्चा करताना सकारात्मक भूमिका घेणे, शाळेविषयी आवड निर्माण होईल आणि ती आवड वाढेल अशाप्रकारे संवाद ठेवणे, शाळेचे आपल्या जीवनात किती महत्त्व आहे हे मुलांच्या मनावर कळत नकळतपणे बिंबवणे याकरिता जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. शाळा सुरु झाल्यावर पहिल्या दिवसापासून मुलं शाळेतून आल्यावर आठवणीने वेळ काढून त्याच्यासोबत शाळा, शिक्षक, त्याचे मित्र यासंदर्भात बोलले पाहिजे. त्याच्या मनातील विचार जाणून घ्यायला पाहिजे. त्याच्या शंका, समस्या, अभ्यास महत्त्वाचा आहे; पण नक्की कशासाठी, याची उत्तरं आपण पालकांनी शोधू या आणि मग त्यासाठी मुलांच्या मागे लागू या.शाळेबाहेरही आयुष्य आहे, तिथेही खूप शिकता येतं, याची जाणीव ठेवून मुलांशी वागू या. अभ्यासातलाही आनंद त्यांना घ्यायला शिकवूया. अभ्यास त्यांनी करायचाय, आपली शाळा झालीय शिकून, हे लक्षात ठेवू या. लहान असल्यापासून मुलांशी बोलत राहू या, त्यांचं म्हणणं कान देऊन ऐकू या. त्यांना बोलण्याची सवय लावू या. प्रत्येक मुलाचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं, ते आईबापापेक्षाही वेगळं असतं, असू शकतं, हे नीट समजून घेऊन त्याचं वेगळेपण जपू या. त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.शाळा आणि शिक्षकांची भूमिका :काही मुलांच्या बाबतीत शाळा बदलली जाते, मात्र बहुतांश मुले त्याच शाळेत नव्या वर्गात जातात. शाळेत बदल झाला नाही तरी देखील सुटीनंतर नवीन वर्गातील प्रवेश हा मुलांना सुखावणारा व आनंद देणारा असतो. त्यामुळे शाळा आणि शिक्षक यांच्यामार्फत मुलांच्या स्वागताची तयारी ही हवीच. काही नवे प्रवेश घेणारे विद्यार्थी असतात. त्यांचे विशेष स्वागत व्हायला हवे. त्यांची आपुलकीने, आस्थेने चौकशी व्हावी. शिक्षकांमार्फत मुलांसोबत गप्पा, चर्चा या शाळेच्या परिसरात रंगाव्यात. मुलांना मोकळे होण्यास, बोलके होण्यास अधिकाधिक संधी उपलब्ध करून द्यायला हवी. थोडक्यात काय तर शिक्षकांच्या कृतीने मुलांना शाळेत आल्याचा आनंद व्हायला हवा. कारण मुलांना जिथे आनंद आहे, मजा आहे, मस्ती आहे, समाधान आहे तिथे मुले रमतात. त्यांना ते ठिकाण आपलेसे वाटते. म्हणूनच शाळा व घर यातील अंतर दूर होण्याकरिता प्रयत्न व्हायला हवा. असा प्रयत्न मुलांच्या शाळेत येण्यासाठी, टिकण्यासाठी आणि शिकण्यासाठी खूप मदतगार ठरु शकतो.शिक्षकही सुटीनंतर नव्याने शाळेत जाणं, शिकवण्याचं नियोजन, नवीन विद्यार्थी, नवीन उपक्रमांची वाट पाहत असतात. हे सगळं अगदी टिपिकल झालं. आपण थोडं वेगळं करू या. अगदी दोन-अडीच वर्षांच्या मुलांना बालवाडी/अंगणवाडीत घालतो आपण हल्ली. त्यांना अनेक गोष्टींसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं, त्यामुळेच कदाचित ती नवीन जागी जाण्याच्या भीतीने, आईला सोडून दूर राहण्याच्या असुरक्षिततेने रडतात. ती रडतील या भीतीने त्यांच्या माता अस्वस्थ होतात, हे दुष्टचक्र चालूचं राहतं. अनेक मुलं मोठी झाल्यावरही शाळेत जाताना रडतात, डबा खात नाहीत, अभ्यास करत नाहीत, अचानक अबोल होतात.थोडक्यात सुटी संपली आहे आणि आता शाळा सुरु झाली आहे. ही शाळा मुलांवर लादली जाऊ नये, तर ती सहज, सोपी आणि आंनददायी व्यवस्था कशी होईल यासाठी साºयाच जबाबदार घटकांनी दक्षता घ्यायला हवी.२ंल्ल३ङ्म२ँ.२ङ्मल्लं६ंल्ली2@ॅें्र’.ूङ्मे