उल्हासनगर : शहर वाहतूक विभाग व सिंधू एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने रोज डे च्या निमित्ताने नो हॉकिंग कार्यक्रमाचे रविवारी आयोजन केले. विनाकारण हॉर्न वाजवू नये, हॉर्नमुळे कर्णबधिर पण होऊ शकतो असा संदेश यावेळी देण्यात आला.
उल्हासनगरात वाहनांची संख्या जास्त असल्याने, शहर ध्वनी प्रदूषणात अव्वल आहे. ध्वनीं प्रदूषण बाबत नागरिकांत जनजागृती निर्माण करण्यासाठी शहर वाहतूक विभाग व सिंधू एज्यूकेशन सोसायटी यांच्या संयुक्तपणे रोज डे निमित्त नो हॉंकिंग कार्यक्रमाचे आयोजन रविवारी सकाळी ६ वाजता केले होते. यावेळी रिक्षाचालकांसाठी एसएससी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून जनजागृती केली. वाहनचालकांनी व नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावे व विनाकारण हॉर्न वाजवू नये असे आवाहन यावेळी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांनी केले. कार्यक्रमाला उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, वान्या फॉंडेशनच्या सचिव रेखा ठाकूर ,हिरालि फॉंडेशनच्या सरिता खानचंदानी, समाजसेविका डिंपल कुकरेजा व आरएसपी चे शिक्षक उपस्थित होते.