बदलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कॅप्टन आशिष दामले यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड या आंतरराष्ट्रीय संस्थेने घेतली आहे. या आंतरराष्ट्रीय संस्थेने कॅप्टन दामले यांनी कोविडच्या दरम्यान केलेल्या कामाची दखल घेऊन ‘सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट’ देऊन त्यांच्या कामाचा गौरव केला आहे. संक्रमणाच्या कालावधीत कोरोना संक्रमणापासून बचाव, लोकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न आणि कोविडपासून सुरक्षित राहण्यासाठी केलेले उपाय याची दखल घेत हा गौरव करण्यात आला. या पुरस्काराबद्दल भावना व्यक्त करताना दामले म्हणाले की, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना लोकांच्या प्रतिक्रिया आणि कामाची पावती मिळणे हे कोणत्याही कार्यकर्त्यासाठी बळ देणारे, उत्साह वाढवणारे आणि अधिक जोमाने अधिक काम करण्यासाठी प्रेरणा देणारे असते. एका आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेला गौरव हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप समाधान आणि ऊर्जा देणारा आहे. या गौरवाबद्दल मी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन यांचे मनापासून आभार मानतो, असे ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय संस्थेकडून कॅप्टन दामले यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 4:26 AM