नारायण जाधव, ठाणेकल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबतची मैत्री तोडून मैदानात उतरलेल्या भाजपची स्वबळावर सत्ता आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आतापर्यंत त्यांनी शहरात एक-दोन नव्हे तब्बल पाच सभा घेतल्या आहेत. एखाद्या महापालिकेसाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत: एकहाती प्रचार करण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे. मात्र, कपिल पाटील, किसन कथोरे, गणपत गायकवाड यासारख्या पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर त्यांची भिस्त असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थानिक नेते कमालीचे नाराज झाले आहेत. यामुळे लोकसभा-विधानसभेप्रमाणे महापालिकेतही शत-प्रतिशत भाजपासाठी मुख्यमंत्र्यांना संघ स्वयंसेवकांची मनधरणी करावी लागली आहे. कधी डोंबिवली जिमखाना तर कधी एखाद्या व्यायामशाळेत स्वत: जाऊन संघ ‘दक्ष’ राहण्याची मनधरणी केली.महापालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून संपूर्ण प्रचाराची धुरा त्यांनी एकहाती पेलली. त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी शहरात कधी आले, कोठे सभा घेतल्या, काय प्रचार केला आणि कोणाचे ‘कल्याण’ करून गेले, हे खऱ्या अर्थाने २ नोव्हेंबरला निकालाच्या दिवशीच कळणार आहे.पहिल्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट सिटीसाठी ६५०० कोटींचे पॅकेज जाहीर केले. नंतर, अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे शाही भोजन घेतले. या दोन्ही घटना सोशल मीडियावर चांगल्याच गाजल्या. तर, स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसह निवडणुकीशी संबंध नसताना आयुक्त ई. रवींद्रन यांचा फोटो फेसबुकवर वापरून पक्षासह साऱ्यांनाच अडचणीत आणले. त्या २७ गावांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची स्थानिक नेत्यांनी तशी अडचणच केली आहे. कारण, कोकण आयुक्तांनी आपल्या अभ्यासपूर्ण अहवालानुसार त्या गावांची स्वतंत्र महापालिका शक्य नाही, हे लक्षात आणल्यानंतर त्यांना पुन्हा केडीएमसीत समाविष्ट केले. नंतर मात्र ती वगळल्यास काही बिल्डरांच्या ‘लोंढ्यां’मुळे महापालिकेत स्वबळावर भाजपाची ‘मंगलप्रभात’ कशी होईल, असे उपऱ्यांसह काही स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पुन्हा गळी उतरवले. त्यामुळे कोणताही विचार न करता त्यांच्यासारख्या अभ्यासू नेत्याने निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ती गावे पुन्हा वगळली. मात्र, निवडणूक आयोगाने ते न जुमानल्याने त्यांना या प्रचारात पूर्ण ताकदीनिशी उतरवावे लागले. कारण, ते मुख्यमंत्री झाल्यानंतर नवी मुंबई, वसई-विरार, अंबरनाथ- बदलापूर येथे भाजपाने सपाटून मार खाल्ला. कारण स्वपक्षातील असंतुष्टांनीच या ठिकाणी सुरुंग लावला होता.
मुख्यमंत्र्याची प्रतिष्ठा पणाला
By admin | Published: October 29, 2015 11:32 PM