ठाणे - प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा राष्ट्रीय पातळीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शुभारंभ गोरखपूर, उत्तर प्रदेश येथून झाला. ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील गौतम चिंतामण पवार यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते गोरखपूर येथे सन्मानपत्र स्वीकारले. महाराष्ट्रातून या कार्यक्रमासाठी निवड झालेले हे एकमेव शेतकरी होते. आज मोदींच्या हस्ते त्यांच्या सन्मान करण्यात आला असून त्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचा पहिला हफ्ता जमा झाला आहे.
लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागल्यानं सर्व घटकांना खूश करण्याचा प्रयत्न केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार करताना दिसतंय. विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचे, लोकार्पणाचे, उद्घाटनांचे कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित केले जाताहेत. वेगवेगळ्या योजनांचीही अंमलबजावणी झटपट सुरू करण्यात येतेय. अशातच, येत्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारसाठी 'गेमचेंजर' ठरू शकणाऱ्या किसान सन्मान निधी योजनेचा प्रारंभ आज पंतप्रधान मोदींनी केला. या योजनेअंतर्गत देशातील १२ कोटी गरीब शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत तीन टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. या योजनेसाठी आतापर्यंत २ कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केलीय. त्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याचे २ हजार रुपये मोदींनी पाठवले.
शेतकरी सन्मान योजनेचा जिल्हास्तरीय समारंभ जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ शिवाजी पाटील, विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, कृषी विकास अधिकारी प्रफुल्ल बनसोडे, एम. सावंत, तहसीलदार राज तवटे यांच्या उपस्थितीत झाला. दरम्यान, याप्रसंगी लाभार्थी 13 शेतकऱ्यांचा पालकमंत्री यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.