ठाणे : रविवारी ३६७ व्या अभिनय कट्टयावर जागतिक महिलादिनानिमीत्त रणरागिणी पुरस्कार २०१८ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवणाऱ्या एकूण ७ महिलांना गौरविण्यात आले.
प्रार्थनेने कट्ट्याची सुरवात झाल्यानंतर योगिनी ठक्कर,माधुरी गद्रे, नीलम चित्रे, शांता पाटील, शुभा प्रधान यांच्या हस्ते दिपप्रज्वल करण्यात आले व कार्यक्रमास सुरवात झाली. आज आज घडीला महिला शक्तीकरण हा एक सामाजिक विषय न राहता त्याउपर आजच्या महिलेने आपला समाज सशक्त केला आहे. याची कित्येक उदाहरणे आपल्याला समाजाच्या अनेक पातळ्यांवर आढळतात. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी महिला आता त्या पेक्षा एक पाऊल पूढे जाऊन काम करू लागली आणि या आदिशक्तीची खरी ताकद आपल्या समोर आली आहे.मग त्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान असोत वा अनाथांच्या माई ,आपल्या महाराष्ट्राच्या माई सिंधुताई सकपाळ असोत. असं एकही क्षेत्र नाही जिथे आपल्याला स्त्री सामर्थ्य नजरेस येत नाही . जागतिक महिला दिनानिमित्त ३६७ व्या कट्टयाची संध्याकाळ ही ठाण्यातल्या अश्याच काही स्त्री शक्तींचा गौरव करण्यात सज्ज होती. विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवणाऱ्या,आपले जीवन समाज कार्यात वाहून घेतलेल्या ७ मान्यवर महिलांना " रणरागिणी २०१८ " हे पद अभिनय कट्ट्यातर्फे बहाल करण्यात आले. सन्मानपत्र आणि तुळशीचे रोप, शाल असे ह्या गौरवाचे स्वरूप होते. अभिनय कट्ट्यातर्फे देण्यात येणारा हा बहुमान पटकविणाऱ्या गौरवमूर्तींमध्ये आशा मंडपे , अनिता महाजन, प्रतिभा कुलकर्णी, आशा राजदेरकर, वैशाली दुर्गुळे, डॉ.शकुंतला सिंग व इंदिरा आमरे या रणरागिणींचा समावेश होता.अभिनय कट्ट्याचे अध्यक्ष किरण नाकती व त्यांच्या पत्नी संध्या नाकती (संचालिका ,दिव्यांग कला केंद्र) यांच्या हस्ते रणरागिणी २०१८ सन्मानपत्र बहाल करण्यात आले. या सन्मान प्राप्त रणरागिणीमधील आपल्या आयुष्याची ३० वर्षे पत्रकारितेत घालवणारऱ्या आशाताई मंडपे,दिव्यांग मुलांसाठी गेली १५ वर्ष सतत काम करत असलेल्या अनिता महाजन, साहित्यिक आशा राजदरेकर यांनी याप्रसंगी उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधत आपल्या भावनांना वाट मोकळी केली. यया सोबतच ३० वर्ष अध्यापन आणि १५ वर्ष प्राचार्याची धुरा सांभाळणाऱ्या जोशी बेडेकर विद्यालयाच्या डॉ.शकुंतला सिंग यांनी अभिनय कट्ट्याच्या उपक्रमाचे कौतुक करत आभार व्यक्त केले. सेवा रत्न पुरस्कार प्राप्त ७४ वर्षीय ज्येष्ठ समाज सेविका प्रतिभा कुलकर्णी ,आणि प्राणी मित्र म्हणून काम करताना प्राण्यांसंबंधित २०० च्या वर अधिक प्रकरणं हाताळणाऱ्या वैशाली दुर्गुळे यांनी सुद्धा उपस्थितांशी संवाद साधला. रणरागिणी २०१८ च्या रणरागिणी पुरस्कारांमध्ये विशेष गोष्ट म्हणजे सुमारे २००० च्या वर प्रसूती करणाऱ्या १०२ वर्षीय मा. इंदिरा धोंडू आमरे यांनी सलग ६० वर्षे हे पुण्याचे कार्य केले असून आमरे आजींच्या घरी जाऊन संचालक किरण नाकती व संध्या नाकती यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . यावेळी महिला दिनानिमित्त रेणुका कलामंच,ठाणे ह्या महिलांच्या ग्रुप तर्फे भक्ती रसाच्या कावडी हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या मध्ये नाट्यमय, रूपकात्मक भजनी भारूडाचा समावेश होता. आज वर देश विदेशातून २०० हुन अधिक प्रयोग करणाऱ्या या कार्यक्रमाची निर्मिती व निरूपण रेखा बेलपाठक यांचे होते व सहकलाकार म्हणून मीना राजे, वर्षा सकपाळ, राजश्री मुळेकर, साधना जानोस्कर,स्मिता नेरूळकर, वर्षा ओंगळे, छाया टिपणीस यांनी त्यांना उत्तम साथ दिली. या वेळी ढोलकीवर फक्कड साथ लाभली ती वेदांत जमगावकर याची. कट्ट्याच्या पुढील सत्रात कावेरी कुऱ्हाडे ,प्रियांका पालव व कविता जोशी या त्रिकूटाने महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या गाण्यावर ताल धरत रसिकांचे मनोरंजन केले तर शिल्पा लाडवंते हिने तांडव नृत्या द्वारे उपस्थितांची मने जिंकली. परेश दळवी याने ती फुलराणी या अजरामर कलाकृतीतील फुलराणी ही स्त्री पात्र एका नाट्य छटेद्वारे बाखुबी निभावले. कार्यक्रमाच्या शेवटी कट्ट्यावर उपस्थित सर्वच महिलांचा महिलादिनानिमित्त सौ संध्या नाकती यांच्या हस्ते तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. अध्यक्षिय भाषणाद्वारे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या निवेदनाची धुरा माधुरी कोळी आणि राजश्री गडीकर यांनी यशस्वी रित्या पार पाडली.