नितीन पंडितभिवंडी - महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने आयोजित केलेल्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागामार्फत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धांमध्ये राज्यस्तरावर भिवंडी महापालिकेस तृतीय क्रमांक प्राप्त झाला असून सोमवारी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे पार पडलेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमामध्ये भिवंडी महानगरपालिकेस सन्मानपत्र व एक लाख रुपये रक्कमेचा पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठी भाषा गौरव दिनी मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व मराठी भाषा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनिषा पाटणकर म्हैसकर यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत हे पारितोषिक मनपा प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ व माहिती व जनसंपर्क अधिकारी सुनील झळके यांनी स्वीकारले.
देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून मराठी,अमराठी लोकांमध्ये मराठी भाषेबाबत आपुलकी वाढीस लागावी व जागृती निर्माण व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने सर्व महानगरपालिका स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. भिवंडी मनपाने या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.पालिका क्षेत्रातील मनपा व खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यांनी करिता गद्य वाचन स्पर्धा,निबंध स्पर्धा,स्वरचित घोषवाक्य स्पर्धा,स्वरचित काव्य लेखन स्पर्धा व चारोळी स्पर्धा, बोली भाषा स्पर्धा, एकपात्री, नाटक,पथनाट्य,अभिनय स्पर्धा,पत्रव्यवहारांमध्ये मराठीचे महत्त्व आणि त्याचे नमुने समजावून सांगणे,चर्चासत्र इत्यादी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.