ठाणे - पुणे-नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेचे तुरळक पडसाद मंगळवारी ठाणे जिल्ह्यात उमटले. मात्र व्हॉटसअॅपवर जणू काही दंगल पेटली आहे, अशा पद्धतीचे भडक मेसेज दिवसभर पसरल्याने अफवांना ऊत आला होता. साहजिकच रेल्वे सेवा सुरु आहे का, अमूक एका ठिकाणी हिंसाचार सुरु आहे का, मला विशिष्ट ठिकाणी जायचे आहे तर जाऊ की नको, अशी विचारणा करणारे फोन वृत्तपत्र कार्यालयांसह परस्परांना केले जात होते.ठाणे जिल्ह्यातील ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, उल्हासनगर आदी भागात भीमसैनिकांनी निदर्शने केली, मोर्चे काढले, निषेधाची पत्रके काढली. अगदी किरकोळ घटनांमध्ये टायर जाळणे किंवा वाहनांवर दगड भिरकावण्याचे प्रकार घडले. मात्र व्हॉटसअॅपवर निदर्शनांना हिंसाचाराचे तर किरकोळ दगडफेकीला दंगलीचे स्वरुप प्राप्त झाले होते. त्यामुळे मुंबईत नोकरीकरिता गेलेल्या ठाणे, डोंबिवली, कल्याण व त्या पलीकडच्या मंडळींकडून आपल्या घरी असलेल्या नातलगांना फोन करुन परिस्थितीबाबत विचारणा केली जात होती. घरी असलेली मंडळी मुंबईत हाहाकार माजल्याच्या अफवांमुळे चिंतेत होती. ती आपल्या जीवाभावाच्या माणसांना नीट या, परिस्थिती बघा अन्यथा मुंबईत मुक्काम करा, असे सल्ले देत होती. शाळांच्या सुटीबाबतही असाच संभ्रम पसरवला गेला.सोशल मीडियावर अफवा पसरवणाºयांची गंभीर दखल घेण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी दिला असला तरी मंगळवारी दिवसभरात अशा अफवांचे शेकडो संदेश लोकांच्या मोबाईलवर आले व लाखो लोकांनी ते ‘हे खरे आहे का?’ किंवा ‘फॉरवर्डेड’, असे त्याखाली लिहून पुढे पाठवले. त्यामुळे आता पोलीस कुणाकुणावर कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.ज्या राजकीय शक्तींना दोन समाजात दंगे व्हावे व त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घ्यावी, असे वाटते त्या शक्तींनीच काही अफवांचे मेसेज हेतूत: पेरले असण्याची शंका यावी, अशा पद्धतीने हे संदेश पसरवले गेले. सध्या अनेक मेसेंजर्स उपलब्ध असून त्यांच्यातही तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेतून तर अशा अफवांचा जन्म झालेला नाही ना, याचाही शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.अनेकांना नैराश्यथर्टी फर्स्टच्या रात्री तासभर व्हॉटसअॅप बंद होते. तेव्हा शुभेच्छा संदेश तुंबल्याने अनेकजण निराश झाले.मंगळवारी रस्त्यावर नसलेली दंगल व्हॉटसअॅपवर घडताना पाहून थर्टी फर्स्टच्या रात्रीपेक्षा जास्त नैराश्य आल्याची प्रतिक्रिया काहींनी दिली.
व्हॉटसअॅपवर उसळली मेसेजची भीषण ‘दंगल’, अफवांचा महापूर : भयगंड निर्मितीचे षडयंत्र?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 6:30 AM