- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी समितीचे सदस्य अज्ञातस्थळी गेले असून त्यांचे मोबाईल नॉट रिचेबल झाले. दरम्यान समिती सदस्य असलेले भाजप समर्थक व साई पक्षाचे गजानन शेळके शिवसेनेच्या गळ्याला लागल्याने भाजप व शिवसेना आघाडीची संख्या समसमान होऊन घोडेबाजार तेजीत असल्याची टीका होत आहे.
उल्हासनगर महापालिका स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. स्थायी समिती मधील एकून १६ पैकी भाजपचे-८, भाजप समर्थक साई पक्षाचा-१, शिवसेना-५, रिपाइं-१ व राष्ट्रवादी -१ असे पक्षीय बलाबल आहे. साई पक्षाच्या समर्थक सदस्यामुळे भाजपचे समिती मध्ये स्पष्ट बहुमत आहे.
दरम्यान साई पक्ष्याचे समिती सदस्य गजानन शेळके गेल्या महिन्या पासून नॉट रिचेबल झाले असून ते शिवसेना आघाडीच्या गळ्याशी लागल्याचे बोलले जाते. शेळके यांच्यामुळे भाजप व शिवसेना आघाडीची संख्या समसमान होऊन समिती सभापती पदासाठी समिती सदस्य फोडाफोडीला सुरवात झाली. शेळके यांच्या शिवसेना जवळीकतेमुळे भाजपला धक्का बसला. पक्षाचे सलग दुसरीवेळा सभापती पदाचे स्वप्न भंगणार असल्याचे बोलले जात आहे.
रिपाईचे जिल्हाध्यक्ष, गटनेता व उपमहापौर भगवान भालेराव हे स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेना आघाडीकडून इच्छुक आहेत. मात्र शिवसेना एका गटाचा त्यांना विरोध असल्याने, दुसऱ्या एखाद्या सदस्याचे नाव पुढे येण्याची शक्यता एका स्थानिक शिवसेना नेत्याने नाव प्रसिद्ध ना करण्याच्या अटीवर दिली. भाजपचे स्थायी समितीच्या सदस्यात फोडाफोडी टाळण्यासाठी पक्षाचे एकून ८ सदस्य गोवा याठिकाणी अज्ञात स्थळी गेले. तर शिवसेनेचे-५, रिपाइं-१, राष्ट्रवादी-१ व साई पक्षाचे गजानन शेळके असे ८ समिती सदस्य ठाणे जिल्ह्याच्या एक नेत्याच्या नजरेखाली ठाणे-पालघर जिल्ह्यातील एका हॉटेल मध्ये नजरकैदेत असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना आघाडीकडून वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, त्या समिती सदस्यांच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडणार असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. तर यावेळी भाजपा सभापती पदा बाबत शिवसेनेला धक्का देणार असल्याची माहिती भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दिली. एकूणच स्थायी समिती सभापती पदासाठी भाजप व शिवसेना आघाडी आमने-सामने उभे ठाकले असून घोडेबाजाराला उत आल्याचे बोलले जात आहे.
रिपाइंचे जिल्हाध्यक्ष भालेराव यांच्या भूमिकेकडे लक्ष?
महापालिका शिवसेना आघाडीतील रिपाईचे गटनेता, पक्ष जिल्हाध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव हे स्वतः समिती सभापती पदासाठी इच्छुक आहेत. त्यांच्या भूमिकेकडे शिवसेना आघाडी व भाजप यांचे लक्ष लागून राहिले. सभापती पदासाठी भालेराव यांनी शिवसेनेकडे साकडे घातले. शिवसेनेने त्यांना सभापती पदासाठी उमेदवारी दिली नाहीतर राष्ट्रवादी व साई पक्षाच्या समिती सदस्यांला गळ्याला लावून ते भाजप मध्ये जाण्याचीही शक्यता व्यक्य होत आहे.