सदानंद नाईक उल्हासनगर : कोरोना रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळविलेल्या उल्हासनगर महापालिकेला खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी ३ व्हेंटिलेटर दिले. तसेच महापौर, आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेऊन लहान मुलांसाठी रुग्णालय सुरू करण्याची सूचना केली.
उल्हासनगर देशातील सर्वाधिक घनतेचे शहर असल्याने, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातत्. स्वतःचे रुग्णालय महापालिकेकडे नसल्याने साई प्लॅटिनियम नावाचे खाजगी रुग्णालय दरमहा २० लाख रुपये भाडेतत्वावर घेतले. तसेच आयटीआय कॉलेज इमारत, तहसील कार्यालयाची नवीन इमारतीसह महापालिका शाळेत कोविड आरोग्य केंद्र सुरू केले. सद्यस्थितीत कोरोनाचे दिवसाला २५ पेक्षा कमी पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याने समाधान व्यक्त केले जाते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला यशस्वीपणे थोपविण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबविणार आहे. दरम्यान खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी दुपारी ३ व्हेंटिलेटर दिले. तसेच महापौर लिलाबाई अशान, आयुक्त डॉ राजा दयानिधी, अतिरिक आयुक्त करुणा जुईकर,उपायुक्त अशोक नाईकवाडे, वैधकीय अधिकारी डॉ दिलीप पगारे आदीं सोबत आढावा बैठक घेऊन सूचना केल्या.
खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी महापालिकेच्या घेतलेल्या आढावा बैठकीत कोविड रुग्णालय व आरोग्य केंद्राची माहिती देऊन सूचना केल्या. तसेच तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत असल्याने, शहरात लहान मुलांसाठी विशेष रुग्णालय उभारण्याच्या सूचना केल्या. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपशहरप्रमुख अरुण अशान, राजेंद्र शाहू, संदीप गायकवाड यांच्यासह शिवसैनिक व महापालिका अधिकारी उपस्थित होते.