लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तब्बल १८ रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा एकदा जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे बोट दाखवत यातून आपले अंग काढून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचे दिसले. मात्र, जिल्हा रुग्णालय स्थलांतर प्रक्रिया तीन वर्षांपासून सुरू असताना त्यानुसार आधीच कळवा रुग्णालयाने सतर्क होणे अपेक्षित होते; परंतु गाफीलपणाच कळवा रुग्णालयाला नडला असल्याची बाब यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे.
‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या उपक्रमांतर्गत ठाणे शहराचा कायापालट करण्यात येत आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत रंगरंगोटी, करण्यात येत आहे. या सर्व प्रगतीत अनेक वर्षांपासून आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाकडे मात्र दुर्लक्षच झाल्याचे दोन दिवसांतील घटनांनंतर समोर आले आहे.
‘यंत्रणा सक्षम करणे, विस्तारीकरण गरजेचे’
जिल्हा रुग्णालयाचे सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर करण्यात येत आहे. या प्रक्रियेला तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या कालावधीत कळवा रुग्णालय प्रशासनाने जिल्हा रुग्णालयाचे स्थलांतर होणार असल्याची बाब लक्षात घेऊन कळवा रुग्णालयातील यंत्रणा सक्षम करणे, विस्तारीकरण गरजेचे होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जिल्हा रुग्णालय दाखल केल्यानंतर...
जून महिन्यात जिल्हा रुग्णालयाचे स्थलांतर करण्यात आले. त्यानुसार जून २०२३ ते १३ ऑगस्ट २०२३ या कालावधीत बाह्यरुग्ण विभागात १० हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले, तर इतर रुग्णालयांतून आलेल्या ७४२ रुग्णांवर उपचार झाले, तसेच १८४ छोट्या शस्त्रक्रिया, तर ६९ मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.