अंबरनाथ : कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात एकही रुग्णालय उपचारासाठी पुढे येत नव्हते. मात्र, कोरोनाच्या रुग्णांकडून चांगले बिल वसूल करता येते, याची कल्पना आल्यावर बंद पडलेली खाजगी रुग्णालये आता कोविड रुग्णालये म्हणून चालवली जात आहेत. मात्र, अंबरनाथ शहरात दोन रुग्णालये अशी आहेत की, त्या रुग्णालयांची नोंदणी ही एका डॉक्टरच्या नावावर आणि चालविणारा दुसराच डॉक्टर आहे. त्यामुळे रुग्णांची जबाबदारी नेमकी कोणावर राहणार, हे स्पष्ट होत नाही. रुग्णालये चालविणाºया डॉक्टरची चूक झाल्यास त्याचा भुर्दंड हा रुग्णालये ज्या डॉक्टरच्या नावावर आहेत, त्याला सहन करण्याची वेळ येणार आहे.
अंबरनाथ शहरात नवरेनगर परिसरात शहरातील सर्वात मोठे रुग्णालय उभारण्यात आले आहे. वर्षदोन वर्षे हे रुग्णालय तेजीत सुरू होते. मात्र, कालांतराने रुग्णांच्या तक्रारी वाढल्यावर हे रुग्णालय हळूहळू चालेनासे झाले होते. त्यानंतर एका खाजगी संस्थेने हे रुग्णालय चालविण्यास घेतले. मात्र, त्यांनाही दोन ते तीन वर्षेच हे रुग्णालय चालविता आले. त्यानंतर पुन्हा हे रुग्णालय तिसºया संस्थेला चालविण्यासाठी देण्यात आले. त्या संस्थेलाही हे रुग्णालय चालविता आले नाही. तोटा सहन करावा लागत होता. त्यामुळे या तिसºया संस्थेनेही रुग्णालय गुंडाळले. त्यातच कोरोनाचा प्रभाव वाढल्यावर शहरातील काही खाजगी डॉक्टरांनी हे कोविड रुग्णालय म्हणून सुरू केले.
एप्रिल ते जुलै हा काळ असा होता की, त्या वेळेत कोविड रुग्णालय तर सोडाच इतर रुग्णालयही सुरू करण्यास डॉक्टर घाबरत होते. मात्र, कोरोनाशी एकरूप झाल्यावर आणि कोरोनाविषयी रुग्णांमध्ये असलेली भीती लक्षात घेता या बंद रुग्णालयांना व्यावसायिक स्वरूप आले. या रुग्णालयांची नोंदणी कोणाच्या नावावर आहे, याचा विचार न करता हे रुग्णालय आपत्कालीन परिस्थिती म्हणून कोरोना रुग्णालय म्हणून सुरू करण्यात आले. ती शहराची गरजदेखील होती. त्या काळात नियमांकडे प्रशासनाने दुर्लक्षही केले. परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे हा हेतू असल्याने सर्वकाही सुरळीत सुरू असल्याचा भास निर्माण केला. मात्र, आता हेच रुग्णालय उल्हासनगरच्या एका डॉक्टरला चालविण्यासाठी देण्यात आले आहे. मात्र, या रुग्णालयात उपचार घेत असताना रुग्णांच्या बाबतीत काही चुकीचे घडल्यास त्याची नेमकी जबाबदारी कोणाकडे राहणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दुसरीकडे, अंबरनाथ-बदलापूर रस्त्यावर भेंडीपाडा परिसरात एक बंद रुग्णालय पुन्हा जोमात सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयाला कोणत्याही कोविड रुग्णालयाची परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, त्या ठिकाणी उपचार घेणारे रुग्ण हे बहुसंख्य प्रमाणात कोरोनाग्रस्त आहेत. कोरोनाची चाचणी न करताच त्यांच्यावर उपचार करण्याची यंत्रणा या ठिकाणी उभी करण्यात आली आहे. मात्र, प्रकृती गंभीर झाल्यावर त्यांना लागलीच कोरोना चाचणी करून इतर रुग्णालयात हलविण्यात येते. या रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या जीविताशी खेळण्याचे काम होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. त्यातच, हे रुग्णालय नव्याने सुरू झाल्यावर अवघे वर्षभर सुरू होते. त्यानंतर, ते रुग्णालय बंद करण्यात आले. मात्र, कोरोनाचा काळ येताच या रुग्णालयालाही नवसंजीवनी मिळाली आहे. मात्र, त्या ठिकाणी काही गैर झाल्यास त्याची जबाबदारी रुग्णालय चालविणाºया डॉक्टरची असणार की, ज्याच्या नावावर हे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे त्याची असणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.नवरेनगरमधील रुग्णालय भाड्यानेनवरेनगर येथील रुग्णालय हे शहरातील एका हृदयरोगतज्ज्ञाच्या नावावर असून त्याने हे रुग्णालय इतर डॉक्टरांना भाडेतत्त्वावर दिले आहे. विशेष म्हणजे भाड्याने दिल्यावर त्या रुग्णालयात तपासणीसाठीदेखील ते येत नाहीत. परवाना डॉक्टरच्या नावावर असतानाही डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध होत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यातच कोविड रुग्णालय चालवितानाही परवानाधारक डॉक्टर केवळ आर्थिक लाभापुरते मर्यादित राहिले आहेत.