मीरा रोड : मीरा रोड येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे चार वर्षांपासून रखडलेले काम अखेर मार्गी लागण्याची चिन्हे असून २०० मुलांच्या क्षमतेचे हे वसतिगृह आदिवासी विकास विभाग बांधणार, यावर शिक्कामोर्तब आदिवासी कल्याणमंत्री विष्णू सवरा यांच्याकडे झालेल्या बैठकीत झाल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.सहा हजार ६०० चौरस मीटर क्षेत्राच्या भूखंडापैकी चार हजार २३० चौरस मीटर क्षेत्र सरकारी वसतिगृहाच्या इमारतीसाठी उपलब्ध झाले आहे. या ठिकाणी २० कोटी २१ लाख खर्चून ३२८ आदिवासी मुलांच्या वसतिगृहाच्या कामास आॅगस्ट २०१४ मध्ये मंजुरी मिळाली होती. सुरुवातीला हे वसतिगृह बांधण्यासाठी मीरा-भार्इंदर महापालिकेकडे जबाबदारी दिली होती. परंतु, तीनवेळा फेरनिविदा काढूनही मंजूर खर्चाच्या तब्बल ४० टक्के इतक्या अधिक रकमेच्या निविदा आल्याने सरकारने वाढीव निधी देण्यास नकार दिला. त्यामुळे सदर वसतिगृह बारगळले.दरम्यान, जुलै २०१६ मध्ये आदिवासी विभागामध्येच स्वतंत्र बांधकाम विभाग निर्माण करून त्याद्वारे आश्रमशाळा, वसतिगृह बांधण्याचा निर्णय झाल्याने मीरा रोड येथील वसतिगृहाच्या कामास पुन्हा चालना मिळाली.जुलै २०१७ मध्ये या विभागामार्फत वसतिगृहाचा आढावा घेऊन एप्रिल २०१८ मध्ये २०० मुलांसाठी वसतिगृह बांधण्याचा आराखडा तयार केला गेला.>सरनाईक यांनी केला पाठपुरावाआॅक्टोबरमध्ये उपसचिवांकडे वसतिगृह बांधण्याच्या कामास गती देण्यासाठी आढावा बैठक झाली. शहराच्या ठिकाणी आदिवासी मुलांसाठी जास्त जागेची वसतिगृह बांधण्याची निकड मान्य करत अधिकचे चटईक्षेत्र मिळण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले. या वसतिगृहाची मागणी व त्याचा पाठपुरावा करणारे सरनाईक यांनी वसतिगृहाचे बांधकाम सुरू व्हावे, म्हणून मंत्री सवरा यांना पत्र देऊन बैठक बोलावण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने सवरा यांच्याकडे झालेल्या बैठकीत वसतिगृहाचे काम सुरू करण्यासह आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सरनाईक म्हणाले.
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी होणार वसतिगृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 1:26 AM