ठाणे : धर्मवीर आनंद दिघे क्रीडा नगरीत प्रशांत जाधवर फाऊंडेशन आणि विट्ठ क्रीडा मंडळ आयोजित कुमारांच्या सुवर्ण महोत्सवी राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबडी स्पर्धेत यजमान ठाण्याच्या संघाची संमिश्र यशाने सुरुवात झाली. मुलांच्या सलामीच्या लढतीत ठाणे ग्रामीण संघाने रंगतदार लढतीत पिछाडी भरून काढत नाशिक शहर संघाला मात दिली तर मुलींच्या लढतीत आघाडी घेऊन सुद्धा ठाणे ग्रामीण संघाला मुंबई उपनगर पश्चिम संघाविरुद्ध पराभव पत्करावा लागला अन्य लढतीमध्ये पुणे ग्रामीणच्या दोन्ही संघाने स्पर्धेत विजयी सुरुवात केली.
कुमार गटातील ठाणे ग्रामीण आणि नाशिक शहर या संघातील लढत खूपच रंगतदार ठरली. सामन्याच्या पहिल्या डावात उभय संघ १३-१३ असे बरोबरीत होते. उत्तरार्धातही दोन्ही संघांच्या सावध खेळामुळे गुणफलक दोलायमान स्थितीत होता.सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात दिव्येश पाटीलच्या आक्रमक खेळाने ठाणे ग्रामीण संघाला आघाडी मिळवून दिली. दिव्येशने एकाच चढाईत तीन गडी बाद करत पारडं आपल्या बाजूने झुकवले. दिव्येशने त्याआधी दोन वेळा एकाच चढाईत दोन खेळाडू बाद केले. ठाणे ग्रामीण संघाने दुसऱ्या डावात १८ गुणांची कमाई करत हा सामना ३१-२९ असा जिंकला. सामन्यात हर्ष भोईरने सुरेख पकडी करत दिव्येशला चांगली साथ दिली. पराभूत संघाच्या ऋषी दाबांगे आणि ज्ञानेश्वर शेळकेने चांगला खेळ केला.
कुमारांच्या अन्य लढतीत पुणे ग्रामीण संघाने धुळे संघाचा ४१ - २४ असा पराभव करत विजयाचे खाते खोलले. या सामन्यात कृष्णा चव्हाण, देव शिर्के आणि विकास जाधव यांनी चतुरस्त्र खेळ करत संघाला सहज मिळवून दिला.
मुलींच्या लढतीत आश्वासक आघाडी घेऊन सुद्धा ठाणे ग्रामीण संघाला मुंबई उपनगर पश्चिम संघाविरुद्ध प्रभावाची चव चाखायला लागली. सामन्यतः ठाणे ग्रामीण संघाने १६-१० अशी आघाडी घेतली होती. पण मध्यतरानंतर आक्रमण आणि बचावाचा सुंदर मिलाफ साधत मुंबई उपनगर पश्चिम संघाने २६-२५ अशी बाजी मारली. आकांक्षा बने आणि नयन झाने मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत संघाला विजय मिळवून दिला . तर सानिया ठाकरे आणि वेदिका ठाकरेंचा खेळ ठाणे ग्रामीण संघाचा पराभव टाळू शकला नाही. अन्य लढतीत पुणे ग्रामीण संघाच्या मुलींनी धुळे संघाचे आवाहन ४५-३१ असे परतवून लावले.साक्षी रावडेआणि वैभवी जाधवने पुणे ग्रामीण संघाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. रितिका फुलरंग आणि प्रज्ञा गंबरने धुळे संघाकडून चांगला खेळ केला.