अंबरनाथ : बदलापूरमधील एका हॉटेल व्यावसायिकाने आपल्या हॉटेलमध्येपूरग्रस्तांना पाच दिवस मोफत जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे. तीन दिवस मोफत जेवण देण्यात आले असून आणखी दोन दिवस हा उपक्रम सुरू राहणार आहे. दुपार आणि रात्रीच्या जेवणाची सोय करून पूरग्रस्तांना खरा आधार देण्याचे काम या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
बदलापूर-हेंद्रपाडा परिसरात पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. याच परिसरातील हॉटेल व्यावसायिक भानुदास भोईर, अमित भोईर आणि नगरसेवक किरण भोईर यांनी बदलापुरातील पूरग्रस्तांना मोफत जेवण देऊ न त्यांना खरा आधार दिला. पूर परिस्थितीनंतर नागरिकांची घरात आवराआवर सुरू असल्याने घरात जेवण बनविणे अवघड जात आहे. तसेच घरातील सर्व धान्य पाण्यात भिजल्याने त्यांच्या जेवणाची सोय व्हावी यासाठी त्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन बाजूला ठेवून पाच दिवस दोन्ही वेळचे जेवण देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेत असताना पूरग्रस्तांच्या फोनवरून आॅर्डर घेऊन त्यांना ठरलेल्या वेळेत बोलावून त्यांना जेवणाचे डबे दिले जात आहेत. शनिवारी रात्रीपासून हा उपक्रम सुरूझाला असून बुधवारपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवण्यात येणार आहे. मोफत जेवण दिले जात असले तरी जेवणाचा दर्जा हा योग्य ठेवण्यात आला आहे. भोईर कुटुंबीयांनी राबविलेल्या उपक्रमाचे बदलापुरात मोठे कौतुक होत आहे.दरदिवशी ५०० हून अधिक नागरिकांना जेवणघरात जेवढी माणसे आहेत तेवढे डबे पोहचविण्याचे काम ते करत आहेत. ज्यांना शक्य नाही त्यांना घरपोचही डबे देण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत त्यांच्या हॉटेलमध्ये पूरग्रस्त कुटुंबीयांची वर्दळ वाढली आहे. प्रत्येक पूरग्रस्ताला सन्मानाने वागणूक देत त्यांचे डबे त्यांच्या ताब्यात दिले जात आहेत. दुपारी २५० आणि रात्री ३००हून अधिक नागरिकांना दररोज जेवण दिले जात आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला आहे.