अंबरनाथ : अंबरनाथ शिवाजी चौक ते हुतात्मा चौक या महत्त्वाच्या रस्त्यावरील भुयारी मार्गामध्ये हॉटेलची सर्व घाण टाकली जाते. परिणामी, येथील भुयारी मार्ग हा नेहमी तुंबत आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता या भुयारी मार्गातील चेंबरमधून सर्व पाणी थेट रस्त्यावर आले. मानवी मैला आणि हॉटेलची सर्व घाण रस्त्यावर आल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली होती. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक कार्यालये तसेच मोठी दुकाने असल्याने नागरिक तसेच व्यापाऱ्यांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतो आहे.हुतात्मा चौकाजवळील पनवेलकर प्लाझा या संकुलासमोरील भुयारी मार्ग हा नेहमीच तुंबतो. भुयारी मार्ग सातत्याने भरत असल्याने त्याची नियमित स्वच्छता केली जाते. मात्र या परिसरातील हॉटेलमधील सर्व खाणे हे थेट भुयारी मार्गात टाकले जाते. त्यामुळे येथे वाहिनी तुंबण्याचे प्रकार सातत्याने घडते आहे. सोमवारी दुपारी अचानक एका चेंबरवरील झाकण अचानक पाण्याच्या प्रवाहामुळे तरंगु लागले. पाण्याचा प्रवाह एवढा वेगात होता की त्यामुळे हे झाकण चेंबरच्या वर आले. त्यातून मोठ्या प्रमाणात मैला बाहेर रस्त्यावर आला. मानवी मैला आणि हॉटेलची घाण अचानक रस्त्यावरुन वाहू लागल्याने संपूर्ण स्टेशन परिसरात दुर्गंधी पसरली होती. पाण्याचा प्रवाह एवढ्या वेगात होता की त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर घाण पाणी पसरले होते. त्याच पाण्यातुन नागरिकांना चालत बाहेर पडावे लागत होते. या ठिकाणी हॉटेलची घाण येत असल्याने त्या हॉटेलवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक करत आहेत. सोबत या ठिकाणी असलेल्या वाहिनीवर प्रचंड ताण असल्याने समांतर वाहिनी टाकण्याची मागणी करण्यात येत आहे.
हॉटेलचे खरकटे भुयारी गटारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:00 AM