ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील हॉटस्पॉट परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळालेला नसून या क्षेत्रात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या क्षेत्रातील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी अपेक्षा करण्यात येत होती. मात्र आता थेट एक महिन्यांनी लॉकडाऊन वाढवला असल्याने या परिसरातील दुकानदार आणि व्यापारी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण आहे. शहरातील ३९ ठिकाणे ही हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आली असून यामध्ये १३ ने वाढ झाली आहे. हॉटस्पॉट क्षेत्र वगळून इतर सर्व ठिकाणी नियमाच्या अधीन राहून अनलॉकची प्रक्रिया ठेवण्यात आली असून यासंदर्भात शुक्रवारी दुपारी ठाणे महापालिकेच्या वतीने अद्यादेश काढण्यात आला आहे.
गेल्या दहा ते बारा दिवसांत ठाण्यात कोरोना रुग्णावढीचा वेग काही प्रमाणात कमी झाल्यानंतर हॉटस्पॉट क्षेत्रात दिलासा मिळेल अशी अपेक्षा करण्यात येत होती. मात्र आता हॉटस्पॉट क्षेत्रातील लॉकडाऊन थेट ३१ ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आला असल्याने या क्षेत्रातील नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.१९ जुलैनंतर शहरात हॉटस्पॉट क्षेत्र वगळून इतर सर्व ठिकाणी अनलॉक करण्यात आला होता ,तर हॉटस्पॉट क्षेत्रात ३१ जुलै पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय पालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी घेतला होता. त्यानंतर काही प्रमाणात शहरात रुग्णसंख्या कमी देखील होण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने गेल्या १० ते १२ दिवसांत शहरातील रुग्णसंख्या वाढीचा आढावा घेतल्यानंतर हॉटस्पॉट क्षेत्र कमी होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र हॉटस्पॉटची संख्या माई झालेली नसून उलट यामध्ये वाढ झाली असून १९ जुलै रोजी शहरात २७ असलेल्या हॉटस्पॉटची संख्या आता ३९ वर गेली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ६०० पेक्षा अधिक मृत्यू झाले असून कोरोना रुग्णांच्या संख्येने देखील ५ हजारांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे हॉटस्पॉट क्षेत्रात लॉकडाऊन वाढवणे अनिवार्य असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे असून त्यामुळेच लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. दरम्यान १९ जुलै नंतर लॉकडाऊन वाढवण्यास यापूर्वीच व्यापाऱ्यांनी विरोध केला होता त्यामुळे आता हॉटस्पॉट क्षेत्रातील व्यापाऱ्यांमध्ये देखील नाराजीचे वातावरण आहे.
शहरातील हॉटस्पॉट क्षेत्रे :
* कळवा प्रभाग समिती : भाविक विद्यालयाच्या लागतचा भाग,विठ्ठल मंदिर रोड,बुबेरा रोड,दत्तवाडी,मुंबई पुणे रोड,(दक्षिण),गजानन महाराज मंदिर (पूर्व),६० फीट रोड (पश्चिम), वास्तू आनंद कॉम्प्लेक्स,गोविंद धाम सोसायटी,कळवा नाका,मुंबई पुणे रोड (उत्तर),चेऊलकर रोड (पश्चिम),जानकीबाई साळवी मार्केट रोड ,जाम मस्जिद रोड, शिवाजी नगर,शिवाजी नगर मार्केट ,शिवाजी तलाव, विटावा,
* वागळे प्रभाग समिती : शांती नगरचा भाग, आयटीआय इमारत,किसनगरचा भाग,तानसा पाईप लाईन,नेपच्यून एलिमेंट वाणिज्य इमारत,आश्रम रोड,.
* नौपाडा-कोपरी प्रभाग समिती :आनंदनगर,दौलत नगर,साई एकविरा सोसायटी,कोपरी महापालिका शाळा,सिंधी कॅम्प इमारत क्रमांक २२,कृष्णा बोरकर मार्ग,पारसी वाडी,दौलत नगर इमारती,गुरुनानक सोसायटी,हरिश्चंद्र राऊत मार्ग,प्रेमनगर सोसायटी आणि इतर इमारती,चेंदणी कोळीवाडा,पारसीयन रोड, मिटबंदर रोड.
* माजिवडा- मानपाडा प्रभाग समिती : आझाद नगरचा भाग, जैन मंदिर रोड, मनोरमा नगर, ढोकाळी,छबिया पार्क मधील इमारती, कापूरबावडी
* उथळसर प्रभाग समिती : वृंदावन सोसायटी फेज २, मुंबई-आग्रा हायवे, रोड नं३, रुस्तमजी कावेरी इमारत,रुस्तमजी एक्वा इमारत, निकम गुरुजी रोड, इमारत क्रमांक ३१ ए,२६ ए, साईदीप कॉम्प्लेक्स,सिद्धेश्वर तलावा लागतचा भाग, महादेव गोपाल पाटील रोड,नितीन कंपनी समोरील भाग, नामदेव वाडी भाग,
* वर्तकनगर प्रभाग समिती :हॅपी वॅली होम्स, टिकुजिनी वाडी रोड, कांचन पावर नगर, वसंत विहार,धर्मवीर नगरचा भाग,तुलसीधाम रोड,वर्तक नगर भीम नगर,वसंत लॉन्स,गणेश नगरचा भाग,
* लोकमान्य - सावरकर नगर : यशोधन नगर,लोकमान्य बसस्टोप,दोस्ती रेंटल,संभाजी नगरचा भाग,लोढा पॅराडाईज, कामगार हॉस्पिटल,रामचंद्र नगरचा भाग.
प्रभाग समिती निहाय हॉटस्पॉटची संख्या - प्रभाग समिती
हॉटस्पॉटची संख्या
कळवा
९
वागळे
३
नौपाडा-कोपरी
७
माजिवडा- मानपाडा
३
उथळसर
६
वर्तकनगर
७
लोकमान्य - सावरकर
४