मुंब्राः गॅस सिलेंडरचा नोझल लिकेज झाल्यामुळे लागलेल्या आगीत घरातील विविध प्रकारचे साहित्य जळून नुकसान झाल्याची घटना गुरुवारी सकाळी मुंब्र्यातील रेतीबंदर परीसरात घडली.मुंब्र्यातील रेतीबंदर भागातून धावणा-या मध्य रेल्वेच्या जलद मार्गा जवळील दत्त चौक परीसरात खंडोबा वाडी आहे.
या वाडीतील चाळीमधील घर क्रमांक ९६८ मध्ये सचिन देवकाते रहातात. त्यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा नोझल गुरुवारी लिकेज झाला. त्यातून निघत असलेला गॅस घरामध्ये पसरल्यामुळे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरामध्ये आग लागली. स्थानिक रहिवाशी गुणवंत यांनी याबाबतची माहिती ठामपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली,माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी एक रेस्क्यू वाहनाच्या मदतीने सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले.
या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.परंतु घरातील कपडे,भांडी या संसार उपयोगी वंस्तूसह विद्युत वायरींग जळून नुकसान झाले.सुरक्षेच्या दृष्टीने सदरचा गॅस सिलेंडर अग्निशमन दलाच्या जवानांनी ताब्यात घेतला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिका-यांनी दिली.