ठाणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवूनही काही तांत्रिक अडचणींमुळे वर्तकनगर येथील ५१, ५२ आणि ५३ या तीन पोलीस वसाहतींमधील पोलीस कुटुंबीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळला होता. गुरुवारी पुन्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी संबंधित विकासकाशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावला. त्यानंतर येथील १०८ कुटुुंबीयांपैकी काहींना आकृती हबमधील एमएमआरडीएच्या घरांच्या चाव्या दिल्यामुळे या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.
वर्तकनगर येथील ५१ ते ५३ या तीन इमारती धोकादायक झाल्याने त्या रिक्त करण्याच्या नोटिसा ठाणे महापालिकेसह पोलीस प्रशासनाने बजावल्या होत्या. त्यामुळे हवालदिल झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांनी पालकमंत्री शिंदे यांची भेट घेऊन आपले गाºहाणे मांडले होते. तेव्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये पोलिसांना बेघर करणार नाही, असे आश्वासन शिंदे यांनी पोलिसांच्या शिष्टमंडळाला दिले होते.
भार्इंदरपाडा येथे लोढा कॉम्प्लेक्स येथे असलेली एमएमआरडीएची घरे गैरसोयीची असल्यामुळे तेथे जाण्यास पोलीस कुटुंबीयांनी नकार दिला होता. त्यात वर्तकनगरच्या ‘आकृती हब टाउन’ येथील घरांचे काम पूर्ण झालेले नव्हते. त्यामुळे ही घरे पोलिसांना देण्यास तांत्रिक अडचणी असल्याचे एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए. राजीव यांनी स्पष्ट केले होते. दुसरीकडे पोलीस प्रशासनाकडून मात्र घरे खाली करण्याच्या वारंवार नोटिसा या रहिवाशांना बजावण्यात येत होत्या. त्यामुळे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना हा तिढा सोडविण्यासाठी आग्रह धरला. पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना आकृती हब टाउनची घरे ही महानगरपालिकेकडे पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी त्वरित हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. ही इमारत पूर्ण झालेली नसल्यामुळे मोठा पेच उभा राहिला होता. त्यानंतर, आमदार सरनाईक यांनी आकृती हब टाउनचे विकासक विमल शहा यांच्याशी संपर्कसाधून एका महिन्यात विकासकाकडून इमारत पूर्ण करून घेतली. २६ जुलैला महापालिकेचे सचिव अशोक बुरपुल्ले यांच्याकडे विकासकातर्फे या घरांच्या चाव्या देण्यात आल्या. इमारत क्रमांक ५१ ते ५३ मधील उपस्थित काही पोलीस कुटुंंबीयांना दिल्या.उर्वरित चाव्या उद्या मिळणार आहेत.