लोकमत न्यूज नेटवर्क स्नेहा पावसकर
ठाणे : महाराष्ट्र बोर्डाचे दहावी-बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यंदा परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण दिले गेले आहेत. त्यामुळे यंदा गुणांचे पुनर्मूल्यांकन होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांत समाधान मानावे लागत आहे. मात्र, तरीही आपल्याला कमी गुण मिळाले आणि आपल्या मैत्रिणीला किंवा मित्राला जास्त गुण मिळालेत ते कसे, अशी नाराजी अनेक विद्यार्थ्यांत दिसते आहे.
यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावी-बारावीच्या नियोजित परीक्षाही रद्द केल्या होत्या. अखेर अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल दिले गेले. त्यानुसार निकाल जाहीर झाले. या निकालात नापास होणाऱ्यांचे प्रमाण कमी असून अनेकांना चांगले टक्के मिळाले आहेत. मात्र, तरीही निकालावर समाधानी नसणारे विद्यार्थी पेपर रिचेकिंगचा अर्ज भरतात. त्यातून काही गुण आणि पर्यायाने टक्के वाढतील अशी अपेक्षा त्यांना असते. मात्र यंदा परीक्षाच झाली नाही तर पेपर नाही आणि रिचेकिंग नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी नाराज आहेत, तसेच आपल्या सोबतच्या मित्र, मैत्रिणींना जास्त गुण मिळाले कसे, मला का नाही, असे प्रश्न ते उपस्थित करत आहेत.
------------------
मला माझ्या मैत्रिणीपेक्षा नववीच्या वर्गात अधिक गुण होते. जर ते गुणही यंदाच्या निकालात ग्राह्य धरलेत तर मग मला तिच्यापेक्षा जास्त गुण मिळायला हवे होते, मात्र मला तिच्यापेक्षा आणि अपेक्षेपेक्षा बरेच कमी टक्के मिळाले.
चिन्मयी राहे, विद्यार्थिनी
-----------
मला अकरावीत आणि अंतर्गत परीक्षांमध्ये माझ्या मित्र, मैत्रिणींइतकेच साधारण गुण मिळाले होते. मग आताच्या आमच्या निकालात फरक कसा काय? माझी टक्केवारी इतरांपेक्षा कमी कशी काय? आता यासाठी कोणाला विचारणा करायची?
शाल्व देसाई, विद्यार्थी
-------------
माझ्याच मुलाला नाही तर परिचयातील अनेक मुलांना नववी आणि अंतर्गत मूल्यमापनात चांगले गुण होते, मात्र त्या तुलनेत दहावीचा अंतिम निकाल दिसत नाही. नेमका कोणता फॉर्म्युला वापरला काही स्पष्ट होत नाही; पण रिचेकिंग नसल्याने मुले नाराज आहेत, अशी प्रतिक्रिया एका पालकांनी दिली.
-------------
रिचेकिंग नाही, पण गुण पडताळणीचा वेगळा काही पर्याय आहे का? कसे गुण ग्राह्य धरले हे कळेल का, असे अनेक प्रश्न विचारले जातात. मात्र यंदा शासनाने मुलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने परीक्षा न घेता उलट खूप चांगला फॉर्म्युला वापरून निकाल दिला. अनेकांना चांगले टक्के मिळाले. कोणाला कमी, जास्त झाले असतील तर नाराज होऊ नये, अशाप्रकारे समजावत असल्याचे एका बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितले.