ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २२ मध्ये मतदानाच्या दिवशी २७ हजार ६५० मतदान झाले होते तर मतमोजणीच्यावेळी या प्रभागातून २७ हजार ७१७ मते मिळाल्याची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सहीसह नोंद झाली आहे. मग ही ६७ मते वाढली कोठून असा सवाल मनसेने केला आहे. हा आकड्यांचा खेळ नसून मतपेट्यांचा घोळ आहे व या घोळामागे भाजपा असल्याची टीका मनसेने केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात इव्हीएममशीनमध्ये घोळ झाला आहे. प्रभाग क्रमांक २२मध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी २७ हजार ६५० मते पडल्याची वेबसाईटवर नोंद करण्यात आली. मतमोजणीत या प्रभागातून एकूण २७ हजार ७१७ मते मिळाल्याचे निवडणूक आयोगकडून सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी ही माहिती वेबसाईटवर अपलोड करण्यात आली. या निकालाच्या कागदपत्रावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची अधिकृत सही आहे. अचानक ६७ मते वाढली कशी? या निवडणुकीत हा मोठा घोळ झाला आहे. केवळ ठाण्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मतपेट्यांचा घोळ झाल्याचा आरोप मनसे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एक मत अतिरिक्त असेल तर त्या ठिकाणी पुन्हा निवडणूक घ्यावी लागते. प्रभाग २२ मध्ये तर ६७ अतिरिक्त मते असल्याचे स्पष्ट दिसत असल्याने निवडणूक आयोगाने या निकालास स्थगिती देण्याची मागणी केली. उमेदवाराने या घोळाचा शोध घेण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी) >प्रभाग क्रमांक २२ मधून २७ हजार ६५७ इतक्या मतांची नोंद आहे. स्टेट इलेक्शन कमिशनकडेही हाच आकडा गेला आहे. प्रिटींग मिस्टेकमुळे २७ हजार ७१७ हा आकडा नोंदविला गेला. परंतु, ही तांत्रिक चूक आहे. - अमोल यादव, निवडणूक निर्णय अधिकारी
‘ती’ ६७ मते वाढलीच कशी?
By admin | Published: February 27, 2017 3:31 AM