कल्याण : केडीएमसीतील काही सदस्य पिस्तूल घेऊन महासभेच्या सभागृहात कोणत्या नियमाच्या आधारे बसतात, अशी तक्रार शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी महापालिका सचिव संजय जाधव यांच्याकडे केली आहे. त्यांच्या या तक्रारीमुळे महासभेच्या असुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पिस्तूल घेऊन सभेला हजर राहणाऱ्या नगरसेवकांच्या विरोधात महापालिका कारवाई का करत नाही, असा सवाल म्हात्रे यांनी केला आहे. महापालिकेतील बेकायदा नळजोडण्यांसह अनेक विषयांतील भ्रष्टाचाराविरोधात म्हात्रे यांनी आवाज उठवला आहे. ओपन लॅण्ड टॅक्स कमी करण्याला विरोध केला. याबाबत विविध आंदोलनांद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधल्याने आपल्या जीवितास बिल्डर, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांकडून धोका असल्याचा दावा करत म्हात्रे यांनी महासभेला व स्थायी समितीच्या सभेला गैरहजर राहण्याची परवानगी आयुक्तांकडे मागितली होती. विविध पक्षांचे दबंग नगरसेवक महासभेला त्यांचे समर्थक व बॉडीगार्ड घेऊन महापालिकेत येतात. त्यांनाही महासभेच्या प्रेक्षा गॅलरीत प्रवेश दिला जातो. महासभेत एखाद्याला गोळी लागू शकते, अशी भीती म्हात्रे यांनी उपस्थित केली आहे.आदेशांची अंमलबजावणीच नाही!महासभेत अनेक कारणांवरून यापूर्वी गदारोळ झालेले आहेत. तसेच सदस्य एकमेकांच्या अंगावर धावून जाऊन झटापटीचे प्रसंगही उद्भवलेले आहेत. तसेच त्यांचे समर्थकही महापालिका आवाराबाहेर भिडलेले आहेत. पोलिसांनी अनेकदा सदस्य व त्यांच्या समर्थकांच्या गाड्या चेक केलेल्या आहेत. जीवित सुरक्षिततेसाठी काही सदस्यांकडे अग्निशस्त्र आहेत. त्यांनी ते महासभेत न नेता महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ जमा करावे, असे आदेश प्रशासनाने काढलेले आहेत. त्याची अंमलबजावणीच केली जात नसल्याचा मुद्दा म्हात्रे यांनी यानिमित्ताने पुन्हा उपस्थित केला आहे.