ठाणे : कॉंग्रसेचे नेते राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने ठाण्यात येत आहेत. परंतु त्यांच्या यात्रेचा मार्ग हा वागळे इस्टेट मधून नियोजीत असतांना तो कळवा, मुंब्य्रातून का वळविण्यात आला असा सवाल कॉंग्रेसचे प्रदेशचे नेते मनोज शिंदे यांनी उपस्थित करीत थेट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आव्हान दिले आहे. परंतु शिंदे यांनी उपस्थित केलेल्या सवालनंतर ठाण्यातील कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
भारत जोडो यात्रेनिमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी हे ठाणे जिल्ह्यात येत असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. परंतु नियोजनाबाबत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेबाबत काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांनी आता नाराजी व्यक्त केली आहे. ठाण्यात राहुल गांधी येत असतांना त्यांची पत्रकार परिषद भलतेच घेताहेत असा थेट आरोप आता मनोज शिंदे यांनी केला आहे.राहुल गांधी ठाणे जिल्ह्यात येत असतांना त्यांची यात्रा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा मुंब्रा मतदार संघातून वळवण्यात आल्याने राजकीय वतुर्ळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात काँग्रेसची फारशी ताकद उरलेली नाही. संघटनात्मक पातळीवर भिवंडीतील ठराविक मतदार संघापुरते उरलेल्या काँग्रेसने राहुल गांधींच्या यात्रेचा मुक्काम याच भागात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मात्र भिवंडी वरून निघणारी यात्रा खारेगाव टोल नाक्यावरून थेट मुंब्य्राच्या दिशेने जाणार आहे. येथून कळव्यात आणि पुढे ठाण्यातील जांभळी नाका येथे यात्रा येईल.
जिल्ह्यात कॉंग्रेसची अवस्था फारशी चांगली नाही. त्यात जितेंद्र आव्हाडांनीच या यात्रेचा बराचसा भार आपल्या खांद्यावर घेतल्याची चर्चा आहे आणि त्यामुळेच या यात्रेचा मार्ग हा त्यांच्या कळवा मुंब्य्रातून जाणार असल्याचे बोलले जात आहे. या यात्रेच्या मागार्ची माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदार राजन विचारे, कॉंग्रेस ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण हे उपस्थित होते. परंतु या यात्रेच्या नियोजनात डावलण्यात आल्याने काँग्रेसचा एक गट नाराज असून त्यांनी यात्रेच्या नियोजनाबाबत स्वतंत्र बैठक घेण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच ठाणे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी या पत्रकार परिषदेबाबत उघडपणे नाराजी व्यक्त करत गंभीर आरोप केले आहेत.
राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी देशभरात भारत जोडो यात्रा काढली आहे. महाविकास आघाडीचे नेते या यात्रेत सामील होऊ शकतात.या यात्रेसाठी पक्षाने प्रत्येक ठिकाणी समिती तयार करण्यात आली आहे. या समितीमार्फत यात्रेचे नियोजन केले जात आहे. असे असताना यात्रेच्या नियोजनाबाबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड हे पत्रकार परिषद कशी घेऊ शकतात. असा सवाल उपस्थित करीत जी यात्रा ठाण्यातील वागळे पट्यातून जाणार असतांना तो मार्गच यातून वगळण्यात आल्याचेही शिंदे यांनी सांगितले.