अनिकेत घमंडी ।लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शहराच्या पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाणपूल धोकादायक बनल्याने सप्टेंबर २०१९ पासून वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी गेली २० वर्षे या पुलावरून पश्चिमेहून पूर्वेला येणारी हिंदू नववर्ष स्वागतयात्रा यंदा कोणत्या मार्गावरून व कशी आणावी, असा मोठा पेच आयोजकांसमोर आहे.
नववर्ष स्वागतयात्रा सोहळा सर्वात प्रथम डोंबिवलीत सुरू झाला. गुढीपाडव्याच्या दिवशी पश्चिमेतील भागशाळा मैदानातून सकाळी ६.३० निघणारी स्वागतयात्रा कोपर उड्डाणपुलादरम्यान सकाळी ८ च्या सुमारास येत असे. पुलावर येणाऱ्या या यात्रेचे शेवटचे टोक तेव्हा गोपी सिनेमा परिसरादरम्यान असते. इतके या यात्रेचे भव्य स्वरूप आहे.
दरवर्षी या यात्रेत सुमारे ७० हून अधिक ट्रक, अन्य चारचाकी, टेम्पो वाहने, १०० संस्था तसेच पारंपरिक वेशभूषेत हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी होतात. पण, यंदा कोपर पूल बंद असल्याने ही यात्रा ठाकुर्ली उड्डाणपुलावरून न्यायची का? तसे केल्यास यात्रेचा पूर्ण मार्गच बदलावा लागणार आहे. ठाकुर्ली पूल परिसरातील गल्ल्या अरुंद असल्याने पश्चिमेहून पूर्वेला यात्रा आल्यानंतर ती तेथून कशी न्यायची, असे प्रश्न आयोजकांपुढे निर्माण झाले आहेत.दरम्यान, २५ मार्चला गुढीपाडवा असतानाही त्याच्या नियोजनासंदर्भात अजूनही पहिली बैठक झालेली नाही. त्यामुळे शहरातील संस्थांमध्ये त्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. कोपर उड्डाणपुलामुळे झालेली अडचण कशी सुटेल? हाच ंूचर्चेचा मुख्य विषय आहे.
कोपर पुलामुळे पेच निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी श्री गणेश मंदिर संस्थान आणि विविध संस्था, यंत्रणांसमवेत नजीकच्या काळात बैठक घेतली जाणार आहे. त्यानंतर निर्णय जाहीर केला जाईल.- राहुल दामले, अध्यक्ष, श्रीगणेश मंदिर संस्थान