घोडबंदर : आरिक्षत असलेला रिंग रोड पूर्ण केल्याशिवाय ठाण्याला स्मार्ट सिटीचे वैभव प्राप्त होणार नाही. हा रस्ता गेल्या ३० वर्षात होऊ शकलेला नसल्याने तो मोठा अडसर स्मार्ट सिटीच्या मार्गात बाधक ठरण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून वाहतुकीच्या समस्येवर आयकॉनिक प्रोजेक्ट उभे करण्याचा विचार प्रशासनाकडून सुरु आहे. यामध्ये मेट्रो, एमआरटीएस (मास रेल ट्रान्झीट सिस्टीम), एचसीएमटीआर (हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झीट रोड), जलवाहतूक, पार्किंग प्लाझा, ओवळा डेपो सुधारणा अशा वाहतूक योजनांचा समावेश आहे.यापूर्वीच्या आयुक्तांनी रिंग रेल्वे, एलआरटी, बीआरटीएस, वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटची ठाणेकरांना दाखवलेली स्वप्ने विस्मरणात जात नाही तोच आता पुन्हा स्मार्ट सिटीच्या नावाने योजनांचा पाऊस पाडण्याचे धोरण पालिकेने हाती घेतल्याचे दिसत आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून वेळोवेळी शासनाने मंजूर केलेल्या शहर विकास आराखड्यातील आरक्षित भूखंड विकसित करण्यास प्रशासनाला पूर्ण यश आलेले नाही. आराखड्यात असलेला रिंग रेल्वे मार्ग केला असता तरी वाहतुकीच्या समस्येवर तोडगा निघाला असता. हा मार्ग मेंटल हॉस्पिटल, मुलुंड चेकनाका, रोड नंबर १६, २२, पोखरण रोड,पातलीपाडा बाळकुम, खारटन रोड, ठाणे स्टेशन असा आहे.गेली काही वर्षापासून मागणी असलेल्या विस्तारित ठाणे रेल्वे स्टेशनसाठी जागा उपलब्ध झालेली नाही.रिंग रेल्वेसाठी पाच कोटी खर्च करून योजना मागे पडली आहे. शासनाकडे मागणी केलेली मेंटल हॉस्पिटलची १७ एकर जागा ताब्यात आली नसल्याने कुठचीही योजना मार्गी लागू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी मेट्रो रेल्वेला हिरवा कंदील दाखवला आहे.परंतु प्रत्यक्षात निविदा काढल्यानंतर ती धावण्यासाठी सात वर्षांचा कालवधी लागेल. त्यामुळे मेट्रोने प्रवास करण्याचे भाग्य उजळण्यास दहा वर्षे लोटणार आहेत.
कधी, कसे होणार ठाणे स्मार्ट ?
By admin | Published: October 28, 2015 12:52 AM