बदलापूर : बदलापूरमधील सागर इन्व्हेस्टरमधील शेकडो गुंतवणूकदारांची गुंतवणूक बुडीत निघाल्याचे समोर आले आहे. असे असले तरी गुंतवणूकदार मात्र, अजूनही सागर इन्व्हेस्टरच्या संचालकांवर विश्वास ठेऊन आहेत. दुसरीकडे बदलापूरकरांची गुंतवणूक बुडणार नाही यासाठी आमदार किसन कथोरे यांनी पुढाकार घेतला असून गुंतवणूकदारांची अधिकाधिक रक्कम कशी परत करता येईल यावर विचारमंथन सुरु झाले आहे. त्यातच सागर इन्व्हेस्टचे संचालक सुहास समुद्रे यांना गुंतवणूकदारांपुढे हजर करून त्यांनी नवी आशा निर्माण करून दिली आहे. बदलापूरमधील समुद्रे यांनी ३० वर्षापूर्वी सागर इन्व्हेस्टर नावाने गुंतवणूक कंपनी सुरू केली. यात पैसे गुंतवणूक करणाऱ्यांना २४ टक्के व्याज दिले जात होते. २४ टक्के व्याजाच्या मोहात अनेकांनी सागर इन्व्हेस्टमध्ये गुंतवणूक केली होती. अनेकांनी गुंतविलेल्या पैशांपेक्षा जास्त रक्कमही मिळाली. त्यामुळे पूर्वीच्या गुंतवणूकदारांचा अनुभव पाहता अनेकांनी त्यात पैसे गुंतविले होते. मात्र गेल्या वर्षभरापासून पैशांची आणि वाढीव व्याजाची ही साखळी कमकुवत झाली. त्यातच अनेक गुंतवणूकदारांना पैसे परत देणे शक्य होत नसल्याने सागर कंपनी बुडीत निघाली. त्यातच चार महिन्यात नागरिकांना पैसेच न मिळाल्याने त्यांनीही तक्रारी करण्यास सुरूवात केली. मात्र हे प्रकरण पोलिसांकडे नेल्यास पैसे मिळण्यास विलंब होईल या भीतीने अनेक गुंतवणूकदारांनी आमदार कथोरे यांच्याकडे तक्रार केली. कथोरे यांनी या तक्रारी आणि कोणी किती पैसे गुंतविले होते त्याचा आढावा तयार केला. त्यानुसार सर्व गुंतवणूकदारांची बैठक झाली. य्समुद्रे यांना नागरिकांपुढे उभे करून त्यांना नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास भाग पाडले. कंपनी बुडीत निघाली असली तरी गुंतवणूकदारांचे पैसे देण्यासाठी आपण आपली सर्व संपत्ती देण्यास तयार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पैसे बुडविल्यावर मी पळून गेलेलो नाही. नागरिकांसोबतची माझी बांधिलकी कायम राहील, असे म्हणाले. (प्रतिनिधी)
सागर इन्व्हेस्टमधील पैसे मिळणार?
By admin | Published: May 03, 2017 5:32 AM