संदीप प्रधान, वरिष्ठ सहाय्यक संपादक
ठाण्यात गुढीपाडवा, दसरा, दिवाळी अशा वेगवेगळ्या सणांच्या वेळी गल्लोगल्ली रोषणाई करण्याची हौस वाढली आहे. झाडांवर दिव्यांच्या माळा सोडायच्या किंवा झाडांना दीपमाळा गुंडाळायच्या आणि परिसरात झगमगाट करायचा, हे करण्याकडे राजकीय नेते व महापालिकेचा कल आहे. ठाण्यातील दक्ष नागरिक रोहित जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. झाडांवर पक्षी, कीटक व काही प्राणी वास्तव्य करतात. त्यांच्या जीवनचक्रात या रोषणाईमुळे हस्तक्षेप होतो. प्रखर दिव्यांमुळे त्यांना त्रास होतो. अनेकदा अशा रोषणाईमुळे पक्षी या झाडांवर घरटी करत नाहीत. दिव्यांच्या रोषणाईच्या प्रखर प्रकाशाने काही कीटक, सरडे यांना हानी पोहोचते.
माणूस हा शक्तिशाली असल्याने तो आपल्याला अनुकूल अशा निर्णयांची अंमलबजावणी करताना आजूबाजूच्या जीवसृष्टीवर आपल्या निर्णयांचा काय परिणाम होईल, याचा विचारही करीत नाही. अनेक छोटे कीटक, सरपटणारे प्राणी हे तर अनेकांच्या खिजगणतीतच नसतात. साहजिकच अशा मंडळींना जोशी यांची याचिका अनावश्यक वाटू शकते. ठाणे शहर सणासुदीला सजले असताना त्यात अपशकुन करण्याचा हा प्रयत्न असल्याची काहींची भावना असू शकते. आमच्याच सणांच्या वेळी हे जैवविविधता प्रेम का उफाळून येते, असा अगोचर सवाल करण्याची फॅशन हल्ली वाढली आहे. मात्र त्याला काही अर्थ नाही.
शहरीकरणाच्या रेट्यात अनेक पक्षी, कीटक, सरपटणारे प्राणी यांचे अस्तित्व आपण संपवत आहोत. ज्याप्रमाणे माणसाने बिबट्यांच्या अधिवासात घुसखोरी केल्यामुळे बिबटे मानवी वस्तीत येण्याच्या घटना वाढल्या आहेत. तसाच हा रोषणाईचा सोस आहे. अनेक हॉटेल, रिसॉर्ट आपले ब्रँडिंग होऊन ग्राहकांनी आपल्याकडे यावे याकरिता आपल्या प्रवेशद्वारालगत असलेल्या झाडांवर बारा महिने चोवीस तास रोषणाई करतात. गेल्या काही वर्षांत गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात भर रस्त्यात मंडप घालून सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. अशा वेळी या झाडांवरच हॅलोजन चढवले जातात. अत्यंत प्रखर प्रकाशामुळे त्या झाडावरील पक्ष्यांची घरटी, सरडे, काही कीटक हे पोळून नष्ट होतात; पण कंबर मोडून नाचण्याच्या किंवा गरबाच्या उन्मादात याची जाणीव कुणालाच होत नसेल.
न्यायालयात हा विषय गेल्यावर आता ठाणे महापालिका आपली परवानगी न घेता झाडांवर रोषणाई केली जात असल्याचा दावा करते. मात्र दिवाळीत खुद्द महापालिकाच रोषणाई करते, हे उघड झाल्याने महापालिकेचे पितळ उघडे झाले. कल्याण-डोंबिवलीतही महापालिकेला आता न्यायालयाच्या दणक्याची जाणीव झाल्यावर जाग आली. झाडांवर रोषणाई करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची भाषा करताना अधिकारी ‘कुणी तक्रार केली तर...’, असे पालुपद लावतात. यावरून प्रशासन याबाबत किती बेफिकीर आहे, हेच दिसून येते.