कल्याण - एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी 'भारतरत्न' पुरस्कारवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित करत मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.
'मला सांगा आतापर्यंत ज्यांनाही भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे, त्या यादीमध्ये किती दलित, आदिवासी, मुस्लिम, गरीब, उच्च जातीतील लोक आणि ब्राह्मणांचा समावेश आहे?. बाबासाहेबांनाही मनापासून भारतरत्न पुरस्कार दिला गेला नाही. अगतिकतेच्या परिस्थितीत त्यांना पुरस्कार देण्यात आला', असे म्हणत असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपासहीत काँग्रेसवरही निशाणा साधला.
एपीएमसी ग्राउंडवर वंचित बहुजन आघाडीची रविवारी (27 जानेवारी) जाहीर सभा झाली. यावेळी भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणिअसदुद्दीन ओवैसी यांनी भाजपा-शिवसेना सरकारच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला.
'मी तुम्हाला कापून टाकेन'भाजपा आणि काँग्रेसवर टीकास्त्र सोडताना ओवेसी आक्रमक झाले होते. मतविभाजनाच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, ''मी प्रक्षोभक भाषणं करतो, मतांचं विभाजन करतो, असा माझ्यावर वारंवार आरोप केला जातो. तर तुम्हाला सांगू इच्छितो की, तुमची मतं कापत नाहीय, मी तुम्हालाच कापून टाकेन'', असा धमकीवजा इशाराही ओवेसी यांनी दिला.
आरक्षणाच्या खिरापतींमुळे जातीय संघर्ष अटळ- प्रकाश आंबेडकरप्रकाश आंबेडकर यांनीही यावेळेस भाजपावर जोरदार हल्लाबोल चढवला. आंबेडकर म्हणाले, भाजपाने संविधानाच्या माध्यमातून केंद्रात सत्ता मिळवली. जोपर्यंत बहुमत नव्हते तोपर्यंत भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सहकाराची भाषा होती. परंतु 2014 मध्ये बहुमत मिळताच त्यांनी खरा रंग दाखवण्यास सुरुवात केली. याच आरएसएसने 15 ऑगस्ट हा काळा दिवस साजरा केला आहे. तिरंग्याला न मानणाऱ्यांनी 2014 ला नाक मुठीत धरून नागपूर रेशमबागेत पहिल्यांदा तिरंगा फडकवला. ज्यांनी देशाचा तिरंगा मानला नाही, त्यांच्यावर अद्याप का कारवाई झाली नाही? आजही काँग्रेस याचे उत्तर देत नाही.
आरएसएस ही देशातील एक आतंकवादी संघटना आहे. आरएसएस प्रमुख शस्त्रांची पूजा करतात. देशात पोलीस, लष्कर सक्षम असताना शस्त्रांची गरज काय? आरएसएस ही एका विशिष्ठ समाजाची संघटना असली तरी त्यांच्यासोबत संपूर्ण समाज नाही, ही चांगली गोष्ट आहे. अमेरिका, युरोपमध्ये गेलेले बुद्धीजीवी आरएसएसभक्त आहेत. मग आरएसएसने सांस्कृतिक राष्ट्रवाद काय असतो, तो समजावून सांगावा. आम्ही या देशातील संवैधानिक आणि भौगोलिक राष्ट्रवाद सांगतो. आमचे आव्हान स्वीकारा. पण ते कधीही आव्हान स्वीकारणार नाही. कारण यांचा राष्ट्रवाद म्हणजे मनुवाद आहे. आरएसएसची संस्कृती द्वेषाची आणि एकमेकांना समान न बघणारी आहे, असेही ते म्हणाले.