लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : जागतिक कोरोना महामारीमुळे तीन ते चार महिने घरीच बसून असलेल्या सर्वसामान्य पालकांचे खाण्यापिण्याचे वांदे झाले आहेत. घरात आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. असे असताना वसई तालुक्यातील शाळांनी मनमानी शैक्षणिक शुल्क वाढीव दराने आकारल्यामुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली असून, आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.वसई-विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर रूपेश जाधव यांनी या प्रकरणी वसईच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन येत्या आठ दिवसांत वसईतील शाळांनी मनमानी शुल्क कमी न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. शाळांच्या मनमानी धोरणाबाबत बहुजन विकास आघाडी आता मैदानात उतरत असल्याने शिक्षणसम्राटांचे धाबे दणाणले आहेत. ‘बविआ’च्या इशाऱ्यानंतर सर्वसामान्य पालकांना दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
कोरोनाकाळात शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षणावर शाळांनी भर दिला आहे. वसईतील खासगी शाळांच्या तगाद्यानंतर आधीच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पालकांना विद्यार्थ्यांसाठी नवे मोबाइल फोन, तसेच ऑनलाइन क्लासेससाठी वायफाय व इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली. यात पालकांना भुर्दंड सोसावा लागला. कोरोनाकाळात शाळांनी अडचणीत असलेल्या पालकांप्रति सहानुभूती दाखवून त्यांना दिलासा देणे सयुक्तिक होते; परंतु शाळांनी कोरोनाकाळात शैक्षणिक शुल्कासाठी पालकांकडे तगादा लावला होता. मध्यंतरी, वसई-विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर रूपेश जाधव यांच्याकडे पालकांनी तक्रार केली होती. जाधव यांनी संबंधित शाळा प्रशासनाची भेट घेत शैक्षणिक शुल्कात कपात करून पालकांना दिलासा दिला होता. त्यांच्या आवाहनानंतरही शाळा व्यवस्थापन सुधारले नसल्याचे चित्र आहे.
बविवा आक्रमकआता त्यांनी वसईच्या गटशिक्षणाधिकारी माधवी तांडेल यांना निवेदन देऊन येत्या आठ दिवसांत शाळांना मनमानी शुल्क कमी करण्याचे आदेश दिले नाहीत; तर बहुजन विकास आघाडी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा दिला आहे. काही पालकांनी याबाबत राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, आमदार हितेंद्र ठाकूर, पोलीस उपायुक्तांनाही निवेदने दिली.