ठाणे : ठाण्याचा खासदार कसा असावा? अशा आशयाचे बॅनर ऐन लोकसभेच्या निवडणुकीत ठाण्याच्या विविध भागांत लागले आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांच्या नजरा खिळू लागल्या आहेत. तो कोणी आणि कशासाठी लावला, अशा अनेक चर्चांना उधाण आले आहे.एकीकडे आता ठाणे लोकसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी टप्प्याटप्प्याने सुरूहोत असतानाच अचानक लागलेल्या या बॅनरने नेमका कोणत्या उमेदवाराकडे इशारा केला आहे, याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.या बॅनरवर ठाण्याचा खासदार कसा असावा, असा उल्लेख केला आहे. तसेच त्याखाली उच्चशिक्षित की अल्पशिक्षित? लोकसभेत बोलणारा की लोकसभेत मौन धारण करणारा? आता तरी विचार कर ठाणेकर... असे स्पष्ट लिहिले आहे. अजून उमेदवारी अर्ज भरणे शिल्लक असतानाच अशा प्रकारचे बॅनर लागल्याने नेमका कोणता उमेदवार अल्पशिक्षित आहे, याचे कोडे आता मतदारांनीच सोडवावे, असा तर हेतू बॅनरमागे दिसत आहे.सध्या ठाणे लोकसभेतून शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांचे नाव जवळजवळ अंतिम आहे. तर, राष्ट्रवादीतर्फे आनंद परांजपे यांचे नाव नुकतेच घोषित झाले आहे. त्यामुळे या दोघांमध्येच खऱ्या अर्थाने लढत होणार आहे. या दोघांमध्ये शिक्षित कोण, असा जर विचार केला तर त्यात परांजपे हेच पुढे असल्याचे दिसते. या बॅनरवर मागील बाजूस वही आणि पुढे पाटी असून तीवर हा सर्व सारीपाट मांडला आहे. परंतु, यामध्ये तीन रंगांची एक छोटी रेषसुद्धा ओढली असल्याने यातून तो कोणी लावला, याचा अंदाज येत आहे. एकूणच आता या बॅनरच्या निमित्ताने शिक्षणाचा मुद्दा या निवडणुकीत गाजणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
कसा असावा खासदार?'; ठाण्यातील ‘त्या’ बॅनरनं वेधलं सर्वांचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 12:28 AM