कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवर पडलेले पाच हजार ८२३ खड्डे बुजविल्याची माहिती महापालिकेच्या बांधकाम खात्याने दिली आहे. त्यामुळे खड्डे बुजविण्याच्या कामात आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जागरूक नागरिक मंचाने केला आहे. तसेच खड्डे बुजविण्यावर आतापर्यंत झालेल्या खर्चानुसार एक खड्डा बुजविण्यासाठी २० हजार रुपये खर्च आला का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.यंदा पाऊस लांबल्याने शहरांमधील सर्वच रस्त्यांना खड्डे पडले आहेत. दिवाळी होऊन गेल्यावरही ते भरण्यात आलेले नाही. मात्र, महापालिकेने १५ मेपासून आतापर्यंत शहरातील पाच हजार ८२३ खड्डे बुजविले असून, अद्याप ३२० खड्डे बुजविण्याचे काम बाकी आहे, अशी माहिती दिली आहे. तसेच खड्डे बुजविण्यासाठी तरतूद असलेल्या १७ कोटी रुपयांपैकी ७० टक्के निधी म्हणजे १२ कोटी रुपये खर्च झाल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’च्या हॅलो ‘ठाणे’मध्ये मंगळवारी वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची गंभीर दखल जागरूक नागरिक मंचाचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर, पदाधिकारी विवेक कानडे, संजीता नायर यांनी घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी महापालिका आयुक्त व शहर अभियंत्यांना बुधवारी निवेदन दिले.
मंचाने निवेदनात म्हटले आहे की, ‘महापालिकेस एक खड्डा बुजविण्यासाठी २० हजारांचा खर्च आल्याचे उघड होत आहे. ही सरासरी रक्कम पाहता खड्डे बुजविण्याच्या कामात गैरव्यवहार झाला आहे. १२ कोटी रुपये खर्च करूनही शहरातील सगळ्याच रस्त्यांवरील खड्डे बुजविले गेलेले नाहीत. त्यांची स्थिती जैसे थे अशीच आहे. मग, महापालिकेने कोणत्या ठिकाणचे पाच हजार ८२३ खड्डे बुजविले, असा प्रश्न शिल्लक राहतो. त्याचे कोणतेच उत्तर प्रशासनाकडे नसल्याने याप्रकरणी चौकशी करण्यात यावी. यासंदर्भात १३ नोव्हेंबरला चर्चेसाठी बैठकीला बोलवावे.’ दुसरीकडे यंदाच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीत रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. खड्डे जास्त पडले. तसेच काही ठिकाणी रस्त्यांवरील डांबर वाहून गेले. त्यामुळे रस्ताच वाहून गेला, असा दावा महापालिकेने केला आहे. दरम्यान, मंचाने केलेल्या आरोपांबाबत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते रघुवीर शेळके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.मग तरी खड्डे का?च्निवेदनात पुढे म्हटले आहे, ‘२०१८ मध्ये पावसाळ्यात पाच जणांचा मृत्यू खड्ड्यांमुळे झाला होता. त्यावेळी महापालिकेने १५ कोटी रुपये खड्डे बुजविण्यासाठी मंजूर केले होते. त्यामुळे तेव्हा हा निधी खर्च झाला असताना यंदाच्या वर्षी रस्त्यांवर कमी खड्डे पडले पाहिजे होते. मात्र, यंदाच्या वर्षीही खड्डे बुजविण्यासाठी १७ कोटी रुपये मंजूर केले गेले.’